Breaking News

शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीतून कुटुंबाची सुखरूप सुटका

पुणे, दि. 04, ऑक्टोबर - निगडीतील यमुनानगर येथील कुटूंबाला आज, ’काळ आला होता पण वेळ आली नव्हती याचा प्रत्यय’ आला. येथील फ्लॉट नं. 455  या दुमजली घरात हॉलमध्ये सकाळी सहाच्या सुमारास शॉर्टसर्किटने अचानक आग लागली. मात्र, वेळीच जाग आल्याने मोठी जीवितहानी टळली.यमुनानगर येथील  फ्लॉट नं. 455 येथे डॉ. अरमळकर यांचे घर आहे. येथे त्यांचे आई-वडील व भाऊ राहतात. तसेच वरचा मजला हा भाड्याने दिला होता. तिथे भाडेकरू राहत.  सकाळी सहाच्या सुमारास आई-वडील राहतात तेथे हॉलमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. मात्र, धुराच्या वासाने आगीने रौद्ररूप धारण करण्यापूर्वीच जाग आली.  तसेच घराला मागच्या बाजूला दरवाजा असल्याने ते तेथून बाहेर पडले. तसेच वरच्या मजल्यावरील भाडेकरूंना देखील वेळीच सांगितल्याने तेही घरातून बाहेर पडले.  तो पर्यंत हॉलमध्ये आग मोठ्या प्रमाणात पसरली. अग्निशामक दलाला याची माहिती देताच जवानांनी तातडीने धाव घेतली. मात्र, हॉलमध्ये आग लागल्याने घराचा  मुख्य दरवाजा पूर्ण पॅक झाला होता. जवानांनी हा दरवाजा तोडून अवघ्या 15 ते 20 मिनिटात आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत हॉलमधील संपूर्ण फर्निचर,  टीव्ही आदी साहित्य संपूर्ण जळून खाक झाले. तसेच पार्क केलेल्या सीएनजी वर चालणा-या गाडीलाही या आगीची झळ पोहोचली. मात्र, सुदैवाने वेळीच आगीवर  नियंत्रण मिळवल्याने स्फोट झाला नाही. अन् मोठा अनर्थ टळला.