0
मुंबई, दि. 13, ऑक्टोबर - देशाला उद्योग क्षेत्रात आत्मनिर्भर करण्यासाठी सुरू करण्यात आलेले मेक इन इंडिया आणि राज्याचे मेक इन महाराष्ट्र अभियान आज सातासमुद्रापार  पोहोचले. देशाबाहेर प्रथमच स्वीडनमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने मेक इन महाराष्ट्रचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील आयोजन करण्यात आले. यानिमित्ताने मराठी  उद्यमशीलतेचा जरीपटका स्वीडनची राजधानी स्टॉकहोममध्ये मोठ्या दिमाखात फडकला.
मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या मेक इन इंडिया सप्ताहाच्या यशस्वी आयोजनानंतर प्रथमच अशा स्वरुपाचा मोठा उपक्रम घेण्यात आला. हॉल ऑफ मिरर्स मध्ये झालेल्या या क ार्यक्रमास मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, स्वीडनच्या युरोपिअन युनिअन व्यवहार आणि व्यापार मंत्री न लिंडे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, भारताच्या स्वीडनमधील  राजदूत मनिका मोहता आदींसह उद्योग आणि व्यापार क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते. यावेळी मेक इन इंडिया नियतकालिकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी  मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील प्रगतीपर्वाबाबत उपस्थितांना माहिती दिली. राज्यातील मुंबई ही अर्थ-तंत्रज्ञान तर पुणे ही माहिती-तंत्रज्ञानाची राजधानी आणि नागपूर हे लॉजिस्टिक हब  असल्याचे अभिमानाने सांगून मुख्यमंत्री म्हणाले, देशाची दहा टक्के लोकसंख्या सामावणार्‍या महाराष्ट्राचा राष्ट्रीय सकल उत्पन्नातील वाटा 15 टक्के इतका आहे. सर्व प्रमुख जागतिक  उद्योगांसह शंभरहून अधिक स्वीडीश उद्योगसमूह महाराष्ट्रात कार्यरत आहेत. पायाभूत सुविधांच्या उभारणीतही महाराष्ट्र देशात अग्रेसर असून रस्ते, रेल्वे आणि बंदर विकास प्रकल्पांची  कामे वेगाने सुरू आहेत. त्यातील मुंबई-नागपूर महाराष्ट्र समृद्धी महामार्ग वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे. या सर्व पायाभूत सुविधांमुळे 2030 पर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक लाख कोटी  डॉलर्सचा टप्पा निश्‍चितच गाठेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.
गेली वीस वर्षे चीन हा जगाची फॅक्टरी म्हणून ओळखला जात असला तरी यापुढील काळात भारत हे जगाचे मॅन्युफॅक्चरींग हब म्हणून गौरविले जाईल, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले,  डेमोग्राफी, डेमोक्रॅसी आणि डिमांड यामुळे भारत जगात अग्रेसर असेल हा प्रधानमंत्री नरेंद मोदी यांचा आशावाद लवकरच अस्तित्वात येईल आणि देशाच्या अग्रेसरत्वात महाराष्ट्राचा  पुढाकार असेल. या उपक्रमाच्या आयोजनातून स्वीडन आणि भारत या दोन देशांमध्ये सहकार्याचे नवे पर्व सुरू झाले असून भविष्यात त्याचे सकारात्मक परिणाम निश्‍चितच दृष्टीस  पडतील. यावेळी उपस्थित उद्योजकांशीही मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला.

Post a Comment

 
Top