Breaking News

बागलाण तालुक्यात तरुण शेतकर्‍यांची आत्महत्या

नाशिक, दि. 09, ऑक्टोबर - वीरगाव (ता बागलाण) येथील निलेश धर्मराज देवरे (वय 32) या अविवाहित शेतकरी तरुणाने रविवारी मध्यरात्री राहत्या घरातच  गळफास घेऊन आत्महत्या करण्याची घटना घडली.
वडिलांचे गत पाच ते सहा वर्षांपूर्वी निधन झाले आहे. गत चार ते पाच वर्षांपासून शेतीत समाधानकारक उत्पन्न मिळत नव्हते. तसेच खत विक्रीच्या व्यवसायातही  समाधानकारक जम न बसल्याने हा व्यवसाय ही तोट्यात चालू होता. विविध कार्यकारी सोसायटीच्या कर्जाबरोबरच एका खाजगी फायनान्स कंपनीकडून घर तारण  देऊन निलेशने सुमारे 75 हजारांचे कर्ज घेतले होते. याच बरोबर नात्यागोत्याकडून उसनवारी या स्वरूपात मोठी उचल घेतल्याने त्याच्या डोक्यावर मोठे कर्ज  झाल्याचे बोलले जात आहे.
निलेशची आई मुलीकडे मुक्कामी गेली असल्याने तो घरी एकटाच होता. शनिवारी विरगाव ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर रात्री दहा वाजेपर्यंत त्याने  मित्रमंडळींशी गप्पा गोष्टी केल्यानंतर तो झोपण्यासाठी निघून गेला. मात्र सकाळी आठ वाजूनही तो घराबाहेर न निघाल्याने शेजारील नागरिकांनी घराचा दरवाजा  तोडून घरात प्रवेश केला असता छताच्या लोखंडी पाईपला दोर बांधून त्याने आत्महत्या केल्याचे आढळून आले. सटाणा पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात  आली आहे.