Breaking News

वाचन प्रेरणा दिनानिमित्त आज विविध कार्यक्रम शाळा-महाविद्यालयात होणार साजरे

मुंबई, दि. 13, ऑक्टोबर - माजी राष्ट्रपती दिवंगत ए पी जे अब्दुल कलाम यांच्या स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने15 ऑक्टोबर हा त्यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून  साजरा करण्याचा निर्णय शासनाने दोन वर्षापूर्वी घेतला. 15 ऑक्टोबर रोजी रविवार असल्यामुळे आणि लगेचच दिवाळीची सुट्टी सुरु होत असल्यामुळे शाळा आणि महाविद्यालयांमध्ये  13 व 14 ऑक्टोबर रोजी वाचन प्रेरणा दिन आणि वाचन संस्कृती संबंधित विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. 
वाचन प्रेरणा दिन साजरा करण्याच्या दृष्टीने शाळा, महाविद्यालये, ग्रंथालये यांच्यासह सामाजिक-सांस्कृतिक-साहित्यिक संस्थांचाही मोठ्या प्रमाणावर सहभाग वाढतो आहे. संपूर्ण  महाराष्ट्रात शेकडो शैक्षणिक व सामाजिक संस्थांनी संबंधित कार्यक्रम आयोजित केले आहेत. मुंबईत विविध शाळा आणि महाविद्यालयांमध्ये उद्या आणि 14 ऑक्टोबर या दिवशी  वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात येणार आहे. मराठी भाषा मंत्री विनोद तावडे उद्या सकाळी 10.30 वाजता मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात उपस्थित राहणार आहेत. या ठिकाणी  ‘ग्रंथ वाचनाचा कार्यक्रम यावेळी होणार आहे. सीएसटी येथील सेंट जॉर्ज रुग्णालयातील शासकीय दंत महाविद्यालयात दुपारी 2वाजता होणा-या वाचन प्रेरणा दिनाच्या कार्यक्रमास  उपस्थित राहून श्री.तावडे विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.
शैक्षणिक संस्था व वाचनालये-ग्रंथालयांसह आंबेडकरी साहित्य कला अकादमी (यवतमाळ), ग्रंथ तुमच्या दारी (कुसुमाग्रज प्रतिष्ठान), नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड्स, महाराष्ट्रीय  मंडळ (पुणे), वाचनानंद पुस्तक भिशी (कोल्हापूर), विवेकानंद प्रतिष्ठान (जळगाव), व्यास क्रिएशन्स (ठाणे), स्नेह परिवार (देवरुख), एक कविता अनुदिनी (व्हॉट्सअ‍ॅप गट),  वसंतराव आचरेकर प्रतिष्ठान (कणकवली), स्नेहालय (अहमदनगर), विदर्भ संशोधन मंडळ (नागपूर), नामांकित नियतकालिके इत्यादी वेगळ्या संस्थानी वैविध्यपूर्ण कार्यक्रम आयो जित केले आहेत. कविवर्य विंदा करंदीकर यांच्या जन्म शताब्दीनिमित्त संबंधित कार्यक्रम, समाजमाध्यमांवर (सोशल मीडिया) सखोल साहित्यिक चर्चा, ‘पुस्तक द्यावे-पुस्तक घ्यावे  योजना’, क्रीडाविषयक साहित्यावर परिसंवाद, पुस्तकभिशी फोडणे, ‘पुस्तकांचं गाव (भिलार)’प्रकल्पाची माहिती देण्याचा उपक्रम, दिव्यांग मुलांसाठी बोलक्या पुस्तकांचे श्रवण,वाचन  प्रेरणा सप्ताह, प्राचीन-दुर्मीळ ग्रंथ हाताळण्याची संधी, फिरत्या ग्रंथालयाचे उद्घाटन, निरंतर वाचन...आदी आगळेवेगळे उपक्रम राज्यभरात होणार आहेत, अशीही माहिती श्री. विनोद  तावडे यांनी दिली.
डॉ. सदानंद मोरे, प्रमोद पवार, अभिराम भडकमकर, लक्ष्मीकांत धोंड, श्याम जोशी, आबा पाटील, योगेश सोमण, राजन गवस, श्रीमती धनवंती हर्डीकर, मिलिंद लेले, डॉ, गणेश  राऊत, भाषा संवर्धक बेबीताई गायकवाड,संगीता बर्वे, राहूल सोलापूरकर विविध ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत.
वाचन प्रेरणा दिनानिमित्ताने ई-बुकचे सामूहिक वाचन निवडक कथा, कविता आणि उतारे यांचे अभिवाचन,प्रकाशक, वितरक, ग्रंथालये यांच्या सहकार्याने पुस्तकांचं प्रकाशन आदी क ार्यक्रमही योजण्यात आले आहेत. सार्वजनिक कार्यक्रमात पाहुण्यांना ‘बुके नाही बुक’ ही पुस्तक भेट देण्याच्या सरकारच्या निर्णयाची अंमलबजावणी करावी, जेणेकरुन पुस्तकांचा  प्रसार जास्तीत जास्त प्रमाणात होईल, असे आवाहनही श्री. विनोद तावडे यांनी केले आहे.
मंत्रालयातील सर्व विभागांचे अधिकारी व कर्मचारी 13 ऑक्टोबर रोजी वाचनाचा आनंद लुटणार आहेत. सकाळी 10.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत अधिकारी व कर्मचारी  यांच्याकरिता ‘ग्रंथ वाचन तास व ग्रंथ प्रदर्शन’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. त्रिमूर्ती प्रांगणात वाचनासाठी निवडक पुस्तकेही उपलब्ध करुन देण्यात येतील. यंदा  वाचन प्रेरणा दिन आयोजित करताना केवळ व्याख्याने स्वरुपात हा दिन साजरा करण्याऐवजी वाचन संस्कृती संबंधित विषयावर चर्चासत्र, परिसंवाद, कार्यशाळा, सामूहिक व वैयक्ति क वाचन आदी प्रकारचे कृतीशील व सहभागात्मक कार्यक्रमांचे प्रमाण वाढत आहे.
पुस्तकांच्या गावातही (भिलार येथे) साहित्यिकांशी व मान्यवर कलाकारांशी संवाद साधण्याची संधी वाचक-रसिकांना मिळणार असून, दि. 15 ऑक्टोबर रोजी दु. 3 ते सायं. 5.30  या वेळात साहित्यिक, रसिकांशी पुस्तकांविषयी मनमोकळ्या गप्पा मारणार आहेत, असे श्री. तावडे यांनी सांगितले. 15 ऑक्टोबर रोजी बोरिवली येथे रेल्वे स्थानकावरील हमालांना  पुस्तके भेट देण्यात येणार आहेत तर डबेवाल्यांमध्येही वाचनाची आवड वाढावी यासाठी डबेवाल्यांना पुस्तके भेट देण्यात येतील. वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने फिरत्या ग्रंथालयाचे  उद्घाटनही श्री. तावडे यांच्या हस्ते बोरिवलीमध्ये सकाळी 11 वाजता होणार आहे.
शैक्षणिक-सामाजिक-सांस्कृतिक संस्थांसह सर्वसामान्य नागरिकांनीही वाचन प्रेरणा दिनी उत्साहाने सहभाग घ्यावा, असे आवाहन श्री. तावडे यांनी केले.