Breaking News

‘पंचायतराज’ मुळे शिक्षकांचा आदर कमी - पवार

अहमदनगर, दि. 06, ऑक्टोबर - शिक्षणातून साक्षरता निर्माण झाली, तरी सुसंस्कृतपणा आला नाही, आज सुसंस्कृतपणा शिकवणारे शिक्षण द्यायला हवे सद्यस्थितीला  पंचायत राज व्यवस्थेमुळे गावांतील गुरुजींचा आदरयुक्त दबदबा कमी झाला, अशी खंत आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी व्यक्त केली.
दि. प्रोग्रोसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्यावतीने प्रगत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य सुनील पंडित यांचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल माऊली संकुलात मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी पवार बोलत होते. यावेळी  संस्थेचे अध्यक्ष दि. ना. जोशी .  ना. गो. गाणार, आ. भगवान साळुंखे, माजी आमदार संजीवनी रायकर, शिक्षण उपसंचालक दिनकर टेमकर,  संजय कळमकर, शिक्षक परिषदेचे प्रांताध्यक्ष वेणूनाथ कडू,  बाबासाहेब   काळे,  नरेंद्र  वातकर, पूजाताई चौधरी, के. बाल. राजू, अप्पासाहेब शिंदे आदी  उपस्थित होते.
पवार  म्हणाले  की,  पूर्वीच्या काळी प्राथमिक शाळेतील गुरुजींच्या  आधारावर   गावगाडा चालायचा. लहानांपासून वडिलधार्यांना त्यांचा आधार वाटायचा. गावपातळीवर निर्णय गुरुजींना विश्‍वासात घेऊन घेतले जायचे. पंचायत राज व्यवस्था आल्यापासून गुरुजींचे महत्त्व कमी झाले. या व्यवस्थेमुळे गावात गटतट निर्माण होऊन गुरुजीच अंधातरी झाले.संघटनांचा आधार शोधण्याची त्यांच्यावर वेळ आली. आज मुलांची बौद्धिक पातळी वाढली असली तरी शारीरिक व अध्यात्मिक क्षमता वाढलेली नाही. ती वाढविण्यावर भर द्यायला हवा.सरकारी व्यवस्था व समाजव्यवस्था बरोबरीने चालायला पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.