Breaking News

बुलडाणेकरांना प्यावे लागतंय गटारातील पाणी

बुलडाणा, दि. 12, सप्टेंबर - शहराला येळगाव धरणावरुन पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येतो मात्र, सुंदरखेड येथील योसायटी पेट्रोल पंप चिखली रोडजवळ येळगाववरुन शहरात  येणारी पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया जात आहे. तर ते लिकेज अक्षरश: गटारातील घाणीत असल्याने पाईपलाईन सुरु असताना पाईपलाईनमधील लाखो लिटर पाणी वाया  जाते आणि बंद झाल्यावर त्याच गटारातील सांडपाणी पाईपात जाते. या लिकेजला किमान तीन महिने उलटून गेले तरी निष्क्रीय मुख्याधिकार्‍यासह लोकप्रतिनिधींचे याकडे दूर्लक्ष होत आहे. 
नगर पालिकेतील कर्मचार्‍यांसह नगरसेवक, नगराध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्याकडून दूर्लक्ष झाल्याने शहरातील लोकांना सांडपाणी, घाणपाणी प्यावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यात  बिघाड होवून रोगांची लागण होण्याची शक्यता वर्तविल्या जात आहे. येळगाव धरण ओव्हरफ्लो झाल्यावर मुख्याधिकारी, नगराध्यक्षांसह उपाध्यक्ष आणि नगरसेवकांनी धरणावर जावून  जलपूजन केले. बुलडाणा शहरातील नागरिक पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न  मिटला म्हणून जसे काय आपणच आपल्या हौदातील पाणी धरणात टाकल्यासारखे वागत होते. परंतु धरणावर जावून  जलपूजन करणार्‍यांनी किमान एकदा तरी सोसायटी पेट्रोलपंपाजवळ जावून बुलडाणा शहराला पाणीपुरवठा होत असलेल्या पाईपलाईनचे लिकेज काढण्यासाठी प्रयत्न करावेत. येथील नागरिक ांना वाटेल की, अधिकारी कर्मचारी जनतेसाठी काम करीत आहेत. तर या आगोदर भाईजी राधेश्याम चांडक यांच्या घराजवळ पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. याकडे  अनेक महिने उलटल्यावरसुद्धा कोणाचेही लक्ष गेले नाही. आणि आता सोसायटी पेट्रोलपंपाजवळ पाईपलाईन फुटली याकडेही कुणाचेच लक्ष गेले नाही. सर्व लोकप्रतिनिधींसह अधिकारी व  कर्मचारी दसरा-दिवाळीच्या आनंदात आपले बस्तान बसविण्यात मश्गुल आहेत. मात्र या निष्क्रियतेमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नागरिकांना घाण पाणी प्यावे लागत आहे.  अशा अक्षम्य दूर्लक्षामुळे जर रोज लाखो लिटर पाणी वाया जात असेल तर धरण भरुनही काही फायदा होणार नाही. कारण नगरपालिकेकडे जनतेच्या आरोग्यासाठी स्वच्छ पाणी पुरवठा  व्हावा म्हणून काहीही नियोजन नाही. सध्या तर पाणी फिल्टरसुद्धा बंद असून बिना फिल्टर पाणी आणि जागोजागी पाईपलाईन फुटल्याने त्यात साचणारे घाण पाणीच नागरिकांना पिण्यासाठी  पुरवठा होत असल्याने जनसामान्य नागरिक संतप्त झाले आहेत. म्हणून जनता उग्र रुप धारण करण्यापूर्वीच ठिकठिकाणी फुटलेली पाईपलाईन दुरुस्त करावी, अन्यथा जनता माफ करणार नाही  एवढे मात्र निश्‍चित!