Breaking News

लोणारमध्ये दिवसातून तीनवेळा भारनियमनामुळे पर्यटक व नागरिक त्रस्त!

बुलडाणा, दि. 06, ऑक्टोबर - जागतिक पर्यटन स्थळ लोणार शहरात दिवसातून तीन  वेळा भारनियमन होत असल्यामुळे पर्यटक, व्यापारी, विद्यार्थी  यांना त्रास  होत आहे.  यामुळे दिवसाचे भारनियमन बंद किंवा  कमी करावे, अशी मागणी शिवछत्र मित्र मंडळ संस्थापक  अध्यक्ष नंदकिशोर मापारी यांनी 4 ऑक्टोबर रोजी उपकार्यकारी  अभियंता यांच्याकडे केली आहे.
मागील काही दिवसांपासून रोज 6 तास ते 12 तासांपयर्ंत  भारनियमन होत आहे. मुळातच प्रचंड उकाड्यामुळे नागरिक  त्रस्त असताना आणि अनेक भागात पावसानंतर रोगराई  पसरण्याची भीती असताना हे भारनियमन सुरू झाले आहे.  त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे.  कोळशाच्या टंचाईमुळे औष्णिक वीजनिर्मिती संच बंद पडले  असून, राज्याला 1 ते 1.5 हजार मेगावॅटचा तुटवडा जाणवतो  आहे, त्यामुळे अन्याय पद्धतीने व अकस्मातपणे हे भारनियमन  सुरू झाले आहे. महानिर्मिती कंपनीने कोळशाचा किमान 15  दिवसांचा साठा करण्याच्या बंधनाकडे दुर्लक्ष केल्याने ही गंभीर  परिस्थिती उद्भवली आहे. भारनियमनाचे हे संकट प्रशासकीय  निष्काळजीपणाचा परिणाम असून, त्याचे परिणाम सर्वच  घटकांना भोगावे लागत असल्याचे शिवछत्र मित्र मंडळ अध्यक्ष  नंदकिशोर मापारी यांनी म्हटले आहे. सध्या कृषी क्षेत्राकडून  आणि अन्य ग्राहकांचीही विजेची मागणी वाढली आहे.  विजेअभावी कृषी पंप बंद पडून शेतीला पाणी देणे अशक्य झाले  आहे. यंदा पहिल्या आठवड्यातच ऑक्टोबर हीट जाणवत  असून, भारनियमनामुळे सर्वसामान्य नागरिकांनाही प्रचंड हाल  सोसावे लागत आहेत. ठराविक वेळेतच पाणीपुरवठा होणार्या  शहरांमधील पाण्याचे वेळापत्रकही कोलमडले आहे. शासकीय  व खासगी रुग्णालयांमधील उपचारसुद्धा प्रभावित झाल्याच्या  तक्रारीसमोर आल्या आहेत.
जागतिक पर्यटन स्थळ लोणार  शहरात दिवसातून तीन वेळा भारनियमन होत असल्यामुळे  पर्यटक, व्यापारी, विद्यार्थी यांना नाहक त्रास सहन करावा लागत  आहे. यामुळे दिवसाचे भारनियमन बंद किंवा कमी करण्यात  यावे, अशी मागणी शिवछत्र मित्र मंडळ संस्थापक अध्यक्ष  नंदकिशोर मापारी यांनी 4 ऑक्टोबर रोजी उपकार्यकारी अभियं ता, लोणार यांच्याकडे केली आहे. यावेळी शिवसेना शहर प्रमुख  पांडुरंग सरकटे, कृ.उ.बा.समिती संचालक तेजराव घायाळ,   शिवसेनेचे युवा कार्यकर्ते शंकर डोळे, पं.स.सदस्य मदन सुटे,  अरुण गीते, पांडुरंग मुंढे, संतोष सांगळे, सुनील डोळे, मनोहर  ढाकरके, महादेव सांगळे, गजानन आटोळे उपस्थित होते.