Breaking News

यापुढे सरकारशी सतत संर्घष सुरू राहील-वळसे

। शेतकर्‍यांच्या  प्रश्‍नावर राष्ट्रवादी आक्रमक, जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला मोर्चा

अहमदनगर, दि. 06, ऑक्टोबर - कर्जमाफीच्या नावाखाली शेतकर्‍यांची फसवणूक करून सरकारने शेतकर्‍यांना वेठीस धरले,असा आरोप करत पीक कर्ज,शेती  मालाला  हमीभाव, पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमती,  भारनियमन, बेरोजगारी आदी विषयांवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने  जिल्हाधिकारी कार्यालयावर गुरूवारी मोर्चा काढण्यात आला.
 या मोर्चात राष्ट्रवादीचे माजी मंत्री दिलीपराव वळसे,अंकुशराव काकड आमदार अरूण जगताप ,दादाभाऊ कळमकर,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले,शहर -जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते आमदार वैभव पिचड,नरेंद्र घुले,पांडुरंग अभंग,तसेच शहर व  जिल्हाभरातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सहभागी होते.
मोर्चाच्यावतीने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. यावेळी बोलताना माजी मंत्री वळसे म्हणाले, “ राज्य सरकारच्या धोरणाला जनता कंटाळली आहे. सर्वसामान्य जनता, शेतकरी त्रस्त झाल्यामुळे राष्ट्रवादीला रस्त्यावर उतरावे लागले आहे. आताच नाही तर राष्ट्रवादी पूर्ण ताकदीने  यापुढेही सतत सरकारविरोधात  संघर्षच करणार आहे.  सरकारने कर्जमाफीच्या नावाखाली शेतकर्‍यांची फक्त फसवणूक केली आहे. वेगवेगळे जी.आर. काढून  शेतकर्‍यांना भंडावून सोडले आहे. पेट्रोल, डिझेल वापर तर आता गरिबांच्या हाातबाहेर गेले आहे. जनतेने विश्‍वास ठेवून  या सरकारला   निवडून दिले, परंतु  अच्छे दिन दूरच असल्याचे स्पष्ट आहे. अंकुश काकडे यांनी जीएसटी मुळे व्यापारी त्रस्त झाल्याचे सांगत नोटाबंदीचे नियोजन फसल्याने अनेक व्यवसाय उद्धवस्त झाले आहेत. तरुणांवर बेरोजगारीची वेळ आली आहे. हजारो तरुणांच्या नोकर्‍या गेल्या आहेत.32 हजार कोटींची सरसकट  कर्जमाफी करण्याची घोषणा हवेतच विरली. पालकमंत्र्यांनी गेल्या अडीच वर्षात कोणते प्रश्‍न सोडविले, जिल्ह्यासाठी किती निधी आणला, असा सवाल करत त्यांनी पालकमंत्री राम शिंदे यांच्यावर  टीका केली.  राष्ट्रवादीच्या वतीने शेतकर्‍यांची सरसकट कर्जमाफी करावी ,इंधनाचे दर कमी करावेत,ओ.बी.सी.शिष्यवृत्ती लवकर द्यावी,रब्बी हंगामासाठी कर्ज द्यावे,अंगणवाडी सेविकांचे प्रश्‍न तातडीने सोडावेत ,स्वामिनाथन आयोग लागू करावा,आदी मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.