Breaking News

परतीच्या पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करुन शेतकर्‍यांना मदत द्या - धनंजय मुंडे

मुंबई, दि. 13, ऑक्टोबर - राज्यात मागील काही दिवसांपासून येत असलेल्या परतीच्या पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्याने या नुकसानीचे तातडीने  पंचनामे करुन शेतकर्‍यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी विधान परिषद विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. याबाबत धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्रही  पाठवले आहे. 
राज्यातील मराठवाडा, विदर्भ, खानदेशसह राज्यातील सर्व भागात मागील काही दिवसांपासून परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणावर येत आहे. राज्यातील अनेक भागात जोरदार तर  अनेक ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे. या परतीच्या पावसामुळे राज्यातील शेतकर्‍यांच्या हाताशी आलेल्या पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे. मराठवाड्यात सोयाबीनसह मका,  कपाशी, उडीद, मुग इत्यादी पिकांचे नुकसान झालेले आहे, विदर्भातील कापूस सोयाबीन भिजल्याने कापूस उत्पादक, धान उत्पादक शेतकरीही धास्तावला आहे. फळबागा,  भाजीपाला यांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. या हंगामात सुरुवातीस पावसाचा पडलेला खंड, त्यानंतर आलेली अतिवृष्टी आणि  रोगांच्या साथी, किडींचा प्रादुर्भाव यामुळे हजारो हेक्टर क्षेत्र आधिच बाधीत झाले असतांना परतीच्या पावसाने उरल्या सुरल्या पिकांचेही नुकसान झाले असल्याकडे या पत्रात मुंडे  यांनी मुख्यमंत्री महोदयांचे लक्ष वेधले आहे. या संपूर्ण नुकसानीचे तातडीने पंचनामे करुन शेतकर्‍यांना नुकसान भरपाई देऊन दिलासा द्यावा अशी मागणीही त्यांनी केली आहे.