Breaking News

ठाणे ,पुणे येथील नवीन बांधकामांवरील स्थगिती उठवली

मुंबई, दि. 11, ऑक्टोबर - ठाणे शहरानजीक घोडबंदर रोड व पुण्यानजीक बालेवाडी भागातील नवीन बांधकामांवरील स्थगिती उठवण्याची  परवानगी मुंबई उच्च न्यायालयाने आज दिली.
पिण्याच्या पाण्याची समस्या पहाता नवी बांधकामे करण्यास परवानगी देऊ नये, यासाठी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली  होती. यावरील सुनावणी दरम्यान ठाणे व पुणे महापालिकांनी पाण्याची समस्या सोडवली असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.  यावर या विषयावर नवीन समिती स्थापन करून दर दोन महिन्यांनी या दोन्ही भागांतील पाणीपुरवठा व नवीन बांधकाम यांच्या  नियोजनासंदर्भातील आढावा घेऊन अहवाल सादर करावा, असे आदेशही न्यायालयाने दिले.
शहरातील बांधकामे व गर्दी पहाता प्रशासनाकडून शहराला लागून दूरवर मोठमोठी गृहसंकुले व टोलेजंग इमारतींना परवानगी दिल्या जातात.  मात्र त्या इमारतींना आवश्यक पाणीपुरवठा व अन्य सुविधा पुरवल्या जात नाहीत. याचा परिणाम शहरातील उर्वरित रहिवाशांवर होतो.  याबाबत योग्य तो विचार करून यावर मर्यादा आणाव्यात, असे मतही न्यायालयाने व्यक्त केले.