Breaking News

समाजमाध्यमांच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंनी साधला भाजपवर निशाणा

मुंबई, दि. 09, ऑक्टोबर - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी समाजमाध्यमांच्या मुद्द्यावरून ‘भाजप’मधील वरिष्ठ मंडळींवर निशाणा साधला आहे.  गेल्या काही दिवसांत समाजमाध्यमांतून भाजपविरोधी सूर आळवला जाऊ लागला आहे. त्या संदर्भात राज यांनी व्यंगचित्रातून आपले मत व्यक्त केले असून ते  आपल्या अधिकृत फेसबूक खात्यावरून प्रसिद्ध केले आहे.
या चित्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे. ज्या समाजमाध्यमांच्या  बळावर भाजपने 2014पासून गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या निवडणुकांमध्ये घवघवीत यश मिळवले, तीच समाजमाध्यमे आता भाजपला तापदायक ठरत असल्याचे या  व्यंगचित्रात रेखाटण्यात आले आहे. सध्या राज्यात परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. याचेच औचित्य साधून राज यांनी समाजमाध्यमांतून भाजपवर होणारी  टीका म्हणजे ’परतीचा पाऊस’ असल्याचे सूचक भाष्य केले आहे.