Breaking News

निवडणूक अधिकार्याची भारनियमनाविरोधात पोलिसात तक्रार

औरंगाबाद, दि. 07, ऑक्टोबर - भारनियमनाचा सर्वत्र निषेध चालू असताना पैठण येेथे ग्रामपंचायत निवडणुकीची कामे सुरू असताना भारनियमन केल्यामुळे निवडणूक कामात अडथळा निर्माण झाल्याप्रकरणी तहसीलदारांनी अभियंत्याविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. जिल्ह्यातील 217 ग्रामपंचायतीच्या निवडणुका येत्या शनिवारी (7 ऑक्टोबर) होत आहेत. त्यामध्ये पैठण तालुक्यातील 22 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकीची तयारी तहसील कार्यालयात सुरू आहे. सध्या, ईव्हीएम मशीन सिल करण्यात येत आहेत. पण, भारनियमन सुरू झाल्यामुळे या कामात खंड पडू शकतो, बाधा निर्माण होऊ शकते, अशी शंका आल्याने निवडणूक प्रक्रियेदरम्यान भारनियमन करू नये, असे पत्र तहसीलदार महेश सावंत यांनी महावितरणला दिले होते. निवडणूक प्रक्रियेला बाधा पोहणार नाही, याकरिता महावितरणने अखंड वीजपुरवठा करावा, असे आदेश राज्य निवडणूक विभागानेही काढले आहेत. मात्र, पैठण येथे महावितरणने तहसीलदार यांच्या पत्राकडे व राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाकडे दुर्लक्ष केले. पैठण येथे भारनियमन सुरूच ठेवले. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रियेला बाधा पोहचत आहे. भारनियमन असल्यामुळे निवडणूक अधिकारी व कर्मचार्यांना ईव्हीएम मशीन सिल करण्याचे काम गुरुवारी पहाटे अडीच वाजता संपले. शिवाय गुरुवारी दिवसा मतदान पथकाचे अंतिम आदेश काढणे, पत्रव्यवहार करणे या मतदान प्रक्रियेला अडथळा निर्माण झाला. भारनियमनामुळे निवडणूक प्रक्रियेला मोठ्या प्रमाणात बाधा, अडथळा निर्माण होत असल्याने तहसीलदार महेश सावंत यांनी गुरुवारी संध्याकाळी महावितरणचे पैठण शाखेच्या अभियंत्याविरोधात पैठण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.