Breaking News

ऊर्ध्व गोदावरी प्रकल्पाला लवकरच सुप्रमा अहवालास मंजुरी मिळणार

नाशिक, दि, 12, ऑक्टोबर - मांजरपाडासह इतर प्रवाही वळण योजना आणि पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव पोहोच कालव्याची रखडलेली कामे मार्गी लावण्यासाठी ऊर्ध्व गोदावरी  प्रकल्पाच्या तृतीय सुधारित प्रशासकीय मान्यता अहवालास मंजुरी मिळणार असल्याचे जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव इकबालसिंग चहल यांनी सांगितल्याची माहिती आ.जयवंतराव जाधव  यांनी दिली.
आ.जयवंतराव जाधव यांनी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यासमवेत आयोजित बैठकीत उर्ध्व गोदावरी प्रकल्पास लवकरात लवकर सुप्रमा देण्याची मागणी केली. माजी  उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे सातत्याने या योजनांचा पाठपुरावा करत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. सदर प्रकल्प अहवालाच्या टिपणीला वित्त विभागाची मान्यता मिळाली असून  लवकरच सुप्रमा दिली जाईल असे चहल यांनी यावेळी सांगितले.
नाशिक जिल्ह्यातील पाणलोट क्षेत्रातील पश्‍चिम वाहिनी नद्यांचे गुजरातकडे वाहून जाणारे पाणी अडवून हे पाणी गोदावरी खोर्‍यात वळविण्यासाठी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यामुळे  सुरु झालेल्या मांजरपाडासह इतर प्रवाही वळण योजनांचा उर्ध्व गोदावरी प्रकल्पामध्ये समावेश आहे. मात्र उर्ध्व गोदावरी प्रकल्प अहवाल तृतीय सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी जलसंपदा  विभागाकडे प्रस्ताव पडून असल्याने प्रवाही वळण योजनांचे अंतिम टप्यातील कामे रखडलेली आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या सुप्रमासाठी छगन भुजबळांनी आर्थररोड तुरुंगातून पत्रांद्वारे व  विधानसभा प्रश्‍नांद्वारे सतत पाठपुरावा केला.
सदर प्रवाही वळण योजनांमध्ये सुरगाणा तालुक्यातील मांजरपाडा तर दिंडोरी तालुक्यातील गोळशी महाजे, ननाशी, पायर पाडा, प्रिंप्रज, आंबेगाव, झार्लीपाडा, धोंडाळपाडा, चाफ्याचापाडा,  रानपाडा, चिमणपाडा, आंबाड, गोळशी, हट्टीपाडा, पळसविहीर, चिल्लरपाडा इत्यादी वळण योजनांचा समावेश आहे. या प्रवाही योजनांच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यातील पाणलोट क्षेत्रातील  पश्‍चिम वाहिनी नद्यांचे गुजरातकडे वाहून जाणारे पाणी गोदावरी खोर्‍यामध्ये वळवले जाणार आहे. हे पाणी नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा, दिंडोरी, चांदवड, निफाड, येवला या तालुक्यांना  उपलब्ध होणार असून येथील क्षेत्र मोठ्या प्रमाणात सिंचनाखाली येणार आहे. त्याचबरोबर सुरगाणा व दिंडोरी तालुक्यातील स्थानिक शेतकर्‍यांच्या वापरासाठी पाणी राखीव ठेवण्यात आल्याने  सदर प्रकल्पाच्या जवळच्या शेतकर्‍यांना फायदा होऊन सुरगाणा व दिंडोरी तालुक्यातील सिंचनात सुद्धा मोठी वाढ झाली आहे.
माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी पुढाकार घेतल्याने 2009 साली नाशिक येथे राज्य मंत्रीमंडळाची बैठक संपन्न होऊन सदर बैठकीमध्ये या वळण योजनांना मंजुरी देण्यात आलेली  होती. त्यानुसार पश्‍चिम वाहिनी नद्यांचे पाणी अडवून ते वळण योजनांद्वारे पूर्व वाहिनी खोर्‍यांमध्ये वळविण्यासाठी जलसंपदा विभागाने महत्वकांक्षी योजना हाती घेतलेल्या आहेत.
पश्‍चिम वाहिनी-पूर्व वाहिनी खोरे दुभाजक रेषेच्या पश्‍चिम बाजूला वाहत जाणारे छोटे छोटे नाले तीव्र उतार सुरु होण्याआधी छोटे बंधारे बांधून अडविणे. त्यांचा सांडवा पूर्व बाजूला काढून  सांडव्यावरून वाहून जाणारे पाणी कालव्याद्वारे पूर्व बाजूला गोदावरी खोर्‍यात वळविणे असे या योजनांचे स्वरूप आहे. नाशिक जिल्ह्यातील गोदावरी खोर्‍यातील सिंचनासाठी महत्वाच्या  मांजरपाडा प्रकल्पातील 8.96 किमी लांबीच्या बोगद्याचे 86 टक्के तर धरणाचे व सांडव्याचे जवळजवळ 65 टक्के काम पूर्ण झाले आहे.
इतर प्रवाही वळण योजनांचे 70 ते 80 टक्के काम पूर्ण होऊन सुद्धा सुधारित प्रशासकीय मान्यता नसल्यामुळे किरकोळ कामे बाकी असल्याने या योजना रखडल्या होत्या. तृतीय प्रशासकीय  मान्यता मिळाल्यानंतर जून 2018 पूर्वी या योजना पूर्ण होऊन जिल्ह्यातील अधिकाधिक क्षेत्र सिंचनाखाली येणार असून जिल्ह्यातील पाण्याचा प्रश्‍न काही अंशी सुटणार आहे.