Breaking News

एल्फिन्स्टन रोड दुर्घटना : प. रेल्वेकडून पीडितांसह कुटुंबियांना दीड कोटी रुपये रक्कम सुपूर्द

मुंबई, दि. 03, ऑक्टोबर - अपघातग्रस्त व्यक्ती किंवा त्यांचे नातेवाईक सरकारकडून नुकसान भरपाई मिळविण्यासाठी या ठिकाणाहून त्याठिकाणी चकरा मारीत  असण्याच्या नेहमीच्या दृश्यापासून पश्‍चिम रेल्वेने एल्फिन्स्टन रोडच्या चेंगराचेंगरीत ओळख पटलेल्या बळींच्या कुटुंबियांना काही तासांमध्येच रेल्वेकडून खात्रीपूर्वक  भरपाई मिळते, असा बदल घडविला आहे. पश्‍चिम रेल्वेच्या अधिकार्‍यांनी सांगितले आहे की आतापर्यंत अपघातग्रस्त आणि मृतांचे नातेवाईक यांना 1 कोटी 29 लक्ष  15 हजार रुपये एक्सग्रेशिया राशी देण्यात आली. या घटनेमध्ये मरण पावलेल्या 23 पैकी 22 व्यक्तिंच्या कुटुंबियांना आणि जखमी झालेल्या 34 व्यक्तिंना पश्‍चिम  रेल्वेने आतापर्यंत एक्सग्रेशियाची रक्कम दिली आहे. आम्ही चेक वितरीत करण्यासाठी सातारा आणि अलाहाबाद सारख्या ठिकाणांपर्यंत आमचे कर्मचारी पाठविले  आहेत. अशी परिस्थिती निर्माण झाल्यास आम्ही त्यांना अशाप्रकारे मदत करू शकतो, असे पश्‍चिम रेल्वेचे वरिष्ठ अधिका-यांकडून सांगितले जात आहे.
सुश्री प्रियंका बाळू पसालकर यांच्या वडिलांना चेक देण्यासाठी पुण्याजवळ असणार्‍या गावात रविवारी पश्‍चिम रेल्वेचे कर्मचारी पाठविण्यात आले होते. श्री पसालकर  म्हणाले, आम्ही आमची मुलगी गमावली आहे आणि कोणत्याच गोष्टीने त्याची भरपाई होऊ शकत नाही. परंतु रेल्वेने आमची गरज समजून घेतली आणि आमच्या  गावापर्यंत ते आले, याबद्दल आम्ही रेल्वेचे आभारी आहोत.
आपली आई गमावलेल्या सुश्री निधी चंद्रशेखर शेट्टी म्हणाल्या, पश्‍चिम रेल्वेचे अधिकारी आमच्या घरी आले व त्यांनी चेक दिला. पश्‍चिम रेल्वेचे डिव्हिजनल रेल्वे  मॅनेजर श्री मुकुल जैन यांनी सांगितले, आम्ही प्रत्येक मृत आणि जखमी व्यक्तिला त्याच दिवशी अंतरिम रक्कम देण्यासाठी प्रयत्न केले. रेकॉर्डस तपासून इतर  व्यक्तिंच्या निवासस्थानी दुसर्‍या दिवशी आम्ही चेक पाठविले आहेत.