Breaking News

कल्याण रोडवर स्पीड ब्रेकर तयार न केल्यास आठ दिवसात आंदोलन - राठोड

अहमदनगर, दि. 11, ऑक्टोबर - कल्याण रोडवरील नेप्ती बायपास रोडवर स्पीड ब्रेकर टाकण्यात यावे यासह वाहतुकीसंबंधीत विविध  मागण्यांचे निवेदन शिवसेना उपनेेते अनिल राठोड यांच्या नेतृत्वाखाली  निवासी उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आले.  याप्रसंगी  शहरप्रमुख दिलीप सातपुते, सभागृहनेते गणेश कवडे, नगरसेवक अनिल बोरुडे, भगवान फुलसौंदर, संभाजी कदम, सचिन शिंदे,  प्रा.पारुनाथ ढोकळे, अप्पा नळकांडे, सतीश गिते आदि उपस्थित होते. 
निवेदनात म्हटले आहे की, नेप्ती नाका ते बायापास हा रस्ता शहराचा अतिशय जवळ आहे. या रस्त्यावरुन अनेक नोकरदार, विद्यार्थी व  नागरिक ये-जा करत असतात. दोनच दिवसांपूर्वी या रस्त्यावरील सीना नदी पुलावर आदित्य राजेंद्र वांढेकर या शालेय विद्यार्थ्यांचा दुर्दैवी  अपघाती मृत्यू झाला. या रस्त्यावरुन अवजड वाहनांना बंदी असतांना अवजड वाहने या रस्त्याने ये-जा करत आहे. त्यामुळे वाहतुकीची  नेहमीच कोंडी होते. त्यामुळे आजवर अनेक अपघात झाले आहेत. त्यामुळे नागरिकांना या रस्त्यावरुन ये-जा करतांना जीव मुठीत घेऊन  जावे लागते. या रस्त्यावर तात्काळ वर्दळीच्या ठिकाणी स्पीड ब्रेकर टाकण्यात यावे तसेच मध्यंतरी रस्त्याचे काम झाले परंतु त्यामध्ये पूर्वी  केलेले स्पीड ब्रेकर बुजविण्यात आले. मागील काही दिवसात अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.