Breaking News

रयत क्रांती संघटनेचा मार्केटिंग अधिकार्‍याला घेराव

बुलडाणा, दि. 09, ऑक्टोबर - तुरीला हमीभाव देऊन शासनाने शेतकर्‍यांची तुर खरेदी सुरू केली होती. परंतु तुरीची खरेदी होवून जवळपास दिड महिन्याचा  कालावधी उलटून गेला असतानादेखील अनेक शेतकर्‍यांना तुरीचे चुकारे देण्यात आले नाही. या बाबतची माहिती काही शेतकर्‍यांनी रयत क्रांती संघटनेच्या  कार्यकर्त्याना दिली. त्यावर कार्यकर्त्यासह शेतकर्‍यांनी 3 ऑक्टोबर रोजी संबधित अधिकार्‍यास घेराव घालुन तुरीचे चुकारे तातडीने देण्याची मागणी केली. त्यानंतर  जिल्हा मार्केटिंग अधिकारी कापुरे यांच्याशी संपर्क साधल्या नंतर दोन दिवसात चेकचे वाटप सुरू होणार असे आश्‍वासन त्यांनी दिले. या आश्‍वासनानंतर शेतकरी  कार्यकर्त्यांनी घेराव आंदोलन मागे घेतले. 
शासनाने तुरीला हजार 50 रुपये हमीभाव देऊन नाफेड मार्फत हजारो क्विंटल तुर खरेदी केली आहे. तर येथील बाजार समितीमध्ये नोंद झालेल्या तुरीचा सर्वे  झाल्यानंतरही हजारो क्विंटल तुर मागील महिन्यात खरेदी करण्यात आली आहे. शेतकरी तुरीच्या चेक करीता वारंवार चकरा मारीत आहेत. परंतु जवळपास दिड  महिन्याचा कालावधी उलटून गेला असतानादेखील शेतकर्‍यांना तुरीचे चुकारे देण्यात आले नाही. या बाबत काही शेतकर्‍यांनी रयत क्रांती संघटनेचे प्रशांत ढोरे  पाटिल, विनायक सरनाईक, दिपक सुरडकर यांच्याशी संपर्क साधून त्यांना माहिती दिली. माहिती मिळताच संघटनेच्या कार्यकर्त्यानी तात्काळ तुर खरेदी करणार्‍या  सहकारी संस्थेचे कार्यालय गाठून अधिकार्‍यास धारेवर धरुन तुरीचे चुकार्‍याची मागणी केली. त्यावर त्यांनी पैसे खात्यात पडलेच नसल्याची माहिती दिली. त्यानंतर  विनायक सरनाईक यांनी जिल्हा मार्केटिंग अधिकारी कापुरे यांच्याशी संपर्क साधला त्यांनी 9 कोटी 90 लाख रुपये खात्यामध्ये टाकले असल्याचे सांगून येत्या दोन  दिवसात शेतकर्‍यांना तुरीचे चुकारे मिळण्यास सुरुवात होणार असल्याचे सांगितले.
यावेळी प्रशांत ढोरे पाटिल, विनायक सरनाईक, दिपक सुरडकर, यांनी दिला आहे. यावेळी अनिल चौहान, पुरूषोत्तम कदम, सचिन पडघान, अशोक सुरडकर,  सिद्धेश्‍वर परिहार यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.