Breaking News

औरंगाबादमध्ये फुटबॉल प्रशिक्षण केंद्र उभारणार

औरंगाबाद, दि. 06, ऑक्टोबर - फुटबॉल खेळाला चालना देण्यासाठी देशात कोलकाता आणि औरंगाबाद या दोन शहरांमध्ये फुटबॉल प्रशिक्षण केंद्र उभारण्यात  येणार आहे. औरंगाबादेतील भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (साई) प्रशिक्षण केंद्रात फुटबॉलचे ट्रेनिंग सेंटर उभारले जाणार आहे. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे  अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी याविषयीची घोषणा केली. काही महिन्यांपूर्वीच औरंगाबादेत सिथेंटिक फुटबॉल मैदान उभारणीस मंजुरीही देण्यात आली  आहे. त्यासाठी पाच कोटींचा निधी मंजूर होणार आहे. 
औरंगाबादसह मराठवाड्यातील फुटबॉलला मोठी चालना मिळेल. औरंगाबाद शहरात फुटबॉलसाठी चांगले वातावरण आहे. शिवाय हवामानही पोषक असल्याने  खेळाडूंना याचा निश्‍चितच फायदा होईल. या प्रशिक्षण केंद्रामुळे भारतीय पुरुष व महिला संघांची सराव शिबिरेही साई केंद्रात होतील. सिनिअर, ज्युनिअर फुटबॉल  संघांच्या शिबिरामुळेही मोठी चालना मिळेल. खासदार चंद्रकांत खैरे यांनी फुटबॉल मैदानासाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे. सध्या साई केंद्रात डे-बोर्डिंग व कम  प्ले या योजनांअंतर्गत जवळपास 55 खेळाडू नियमित सराव करीत आहेत. प्रशिक्षण केंद्रामुळे खेळाडूंची संख्या वाढण्यास मदत होईल. त्यातून साहजिकच फुटबॉलचा  प्रसार होणार आहे. लवकरच औरंगाबाद शहर निश्‍चितपणे देशाच्या नकाशात फुटबॉलचे महत्त्वाचे स्थान मिळवेल, असा विश्‍वासही भांडारकर यांनी व्यक्त केला.