Breaking News

पियुष गोयल, रविशंकर प्रसाद यांना मंत्रीपदावरून दूर करा - नवाब मलिक

मुंबई, दि. 13, ऑक्टोबर -  द वायर या ऑनलाईन न्युज पोर्टलने बातमी दिल्यानुसार भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचा मुलगा जय शाह यांच्या टेंपल इंटरप्रायजेस या कं पनीच्या वार्षिक उलाढालीत 16000 पटींनी वाढ झाली आहे. ’ना खाऊंगा, ना खाने दुंगा’ असा नारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला होता. मात्र आता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षाच्या  मुलाने मंदिराच्या नावावर भ्रष्टाचार केल्याचे उघड झाले आहे. 
माध्यमे जेव्हा एखाद्या कंपनीबाबत भ्रष्टाचाराची बातमी देतात, तेव्हा त्या कंपनीला खुलासा मागण्याचा अधिकार असतो. पण जय शहा यांच्या खाजगी कंपनीचा बचाव करण्यासाठी  खुद्द केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल समोर येत आहेत, याचाच अर्थ दाल मे कुछ काला असल्याची टीका नवाब मलिक यांनी केली. पीयूष गोयल हे रेल्वेमंत्री असण्याऐवजी जय शहा  यांच्या कंपनीचे चार्टर्ड अकाऊंटंट असल्यासारखे बचाव करत आहेत.
जय शहा यांच्या टेम्पल इंटरप्रायजेस लिमिटेडमध्ये घोटाळा झाला असल्यास ते चौकशीअंती समोर येईल, परंतु पीयूष गोयल यांच्यासह कायदे मंत्री रविशंकर प्रसाद आणि सरकारचे  अतिरिक्त सॉलिसिटर जनरल कंपनीचे बाजुने उभे राहिले आहेत. सरकारचे कायदा विषयक सल्लागार असतानाही अतिरिक्त सॉलिसिटर जनरल जय शहा यांचा खटला लढत आहेत.  सॉलिसिटर जनरलपदाचा दुरुपयोग केल्यामुळे त्यांनी राजीनामा द्यायला हवा, अशी मागणी नवाब मलिक यांनी केली.
तसेच जोपर्यंत या प्रकरणाची चौकशी होत नाही, तोपर्यंत रेल्वे व कायदे मंत्री यांना मंत्रीपदापासून दूर ठेवले पाहीजे, अशी मागणी त्यांनी पत्रकार परिषदेद्वारे केली.