Breaking News

औरंगाबादमधील रस्त्यांच्या कामासाठी अखेर निविदा सूचना जारी

औरंगाबाद, दि. 05, ऑक्टोबर - राज्य शासनाने शहरातील रस्त्यांसाठी मंजूर केलेल्या 100 कोटी रुपयांतून प्रत्येकी 25 कोटी रुपयांप्रमाणे 4 आणि महापालिका  डिफर पेमेंटमधून 52 कोटी रुपयांच्या दोन अशा एकूण 6 निविदा वेबसाईटवर टाकण्यात आल्या आहेत. 152 कोटी रुपयांच्या निधीतून शहरातील 52 रस्त्यांची  कामे होणार आहेत. राज्य शासनाने औरंगाबादमधील रस्त्यांसाठी 100 कोटी रुपयांचा निधी जून महिन्यातील शेवटच्या आठवड्यात जाहीर केला. ऑगस्ट महिन्यात  या निधीतून करण्यात येणार्या 31 रस्त्यांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता मिळाली. शासकीय निधीसोबतच मनपाच्या डिफर पेमेंटमधून काही रस्त्यांची कामे  व्हावीत, यासाठी सर्वपक्षीय पदाधिकारी आग्रही होते. 100 कोटी रुपयांच्या प्रत्येकी 25 कोटी रुपयांप्रमाणे चार निविदा काढायच्या आणि प्रत्येकासोबत डिफर  पेमेंटच्या साडेबारा कोटींची कामे जोडावयाची असा निर्णय सुरुवातीला घेण्यात आला. प्राप्त निधीतील कामाचे तुकडे पाडून निविदा काढण्यासंदर्भात अडचण निर्माण  झाली, शासनाचे मार्गदर्शन मागविले. शासनाने मनपास्तरवर निर्णय घेण्याचे आदेश दिले. मागच्या पाच दिवसांपासून प्रक्रियेला वेग आला. शनिवार, रविवार, सोमवार  या तीन दिवशी शासकीय सुट्या असल्याने निविदा प्रसिध्द करण्यात आल्या नाहीत. मंगळवार कार्यालयीन दिवस असल्याने सकाळपासून निविदा वेबसाईटवर  टाकण्यास सुरुवात केली. अटी व शर्थी अनेक असल्याने सायंकाळी उशिरापर्यंत हे काम सुरू होते. निविदा सूचना मनपाच्या संकेतस्थळावर पाहता येणार आहेत.