Breaking News

नरभक्षक वाघिणीला गोळी घालणार; वनविभागाचा आदेश उच्च न्यायालयाने ठेवला कायम

नागपूर, दि. 13, ऑक्टोबर - नरभक्षक वाघिणीला गोळ्या मारण्याच्या वनविभागाच्या आदेशावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आज शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे  वन विभागाला आता या वाघिणीला गोळ्या घालता येणार आहे. अनेकांचे बळी घेणार्‍या नरभक्षक वाघिणीला ठार मारण्याचे आदेश वनविभागाने दिले होते.
या आदेशाच्या विरोधात वन्यजीव प्रेमींनी हायकोर्टात दाद मागितली होती. यासंदर्भात न्यायालयाने आज, 12 ऑक्टोबर रोजी दिलेल्या निर्णयात वनविभागाचे आदेश कायम ठेवले  आहेत.ब्रम्हपुरी वनपरिक्षेत्रात हैदोस घालणार्‍या या नरभक्षक वाघिणीला बंदिस्त करण्यात आले होते. त्यानंतर तिला पुन्हा बोर अभयारण्यात सोडण्यात आले होते. त्यानंतर तिने पुन्हा  नागरिकांचे जीव घेतल्याने तिचा वावर असलेल्या परिसरातील नागरिक दहशतीत होते.
चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी वनपरिक्षेत्रातील टी-27-सी-1 वाघिणीने हैदोस घातला होता. परिसरातील गावांमधील ग्रामस्थांचा जीव घेतला. अनेक पाळीव प्राण्यांवर हल्ला करत  त्यांचा फडशा पाडला. त्यामुळे यावर्षी जून महिन्यात या नरभक्षक वाघिणीला ठार करण्याचे आदेश वनविभागाने दिले होते. या आदेशाच्या विरोधात वन्यजीव प्रेमींनी न्यायालयात दाद  मागितली होती. गेल्या 29 जून रोजी न्यायालयाने वनविभागाचे आदेश फेटाळून लावले होते. वाघिणीला बेशुद्ध करून अन्यत्र सोडण्याचे आदेश वनविभागाला दिले होते. दरम्यानच्या  काळात न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे वाघिणीला वर्धा जिल्ह्यातील बोर व्याघ्र प्रकल्पात सोडण्यात आले.
बोर व्याघ्र प्रकल्पात सोडताना तिला रेडिओ कॉलर लावण्यात आली होती. त्यामुळे तिचे लोकेशन वनविभागाला सातत्याने कळत होते. या कालावधीत प्रवास करताना या वाघिणीने  स्थानिक गावकर्‍यांवर हल्ला करून त्यांचे जीव घेतले. आतापर्यंत या वघिणीने चौघांचा बळी घेतला आहे. नागपूर जिल्ह्यातील काटोल-नरखेड भागात वाघीण आल्यावर तेथील र हिवाशी प्रचंड दहशतीत होते. त्यामुळे वनविभागाने तिला ठार मारण्याचे आदेश दिले. या आदेशाला आव्हान देत स्थानिक वन्यजीवप्रेमींनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा  दरवाजा ठोठावला. त्याच याचिकेवर आदेश देत न्यायालयाने आज, गुरुवारी वनविभागाचा आदेश कायम ठेवला.