Breaking News

अंमली पदार्थांद्वारे होणारे दहशतवाद्यांचे फंडिंग थांबवू - हंसराज अहीर

नागपूर, १० ऑक्टोबर - विदेशातून भारतात होणाऱ्या अंमली पदार्थाचा व्‍यापार रोखण्‍यासाठी केंद्रीय गृह मंत्रालय गांभीर्याने कार्यवाही करण्‍यासाठी कटीबद्ध असल्याचे, प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी आज,सोमवारी नागपुरात केले. नागपूर सेंटर ऑफ पोलीस सर्विस येथे आयोजित अंमली पदार्थ नियंत्रण मंडळाच्‍या पश्चिम क्षेत्राची समिक्षा बैठक अहीर यांच्‍या अध्‍यक्षतेखाली झाली, या बैठकीनंतर झालेल्‍या पत्रकार परिषदेत संबोधित करतांना ते बोलत होते. 
याप्रसंगी एन.सी.बी.च्या कार्यवाही विभागाचे उप-महासंचालक डॉ. आर.पी.सिंग, दक्षिण-पश्चिम क्षेत्राचे उप-महासंचालक एम.ए.जैन व नागपूरचे संयुक्‍त पोलीस आयुक्‍त शिवाजी बोडखे उपस्थित होते.
याप्रसंगी अहीर म्हणाले की, एन.सी.बी.च्‍या समिक्षा बैठकीत महाराष्‍ट्र व नागपूर संदर्भातील ड्रग्‍जच्‍या व्‍यापाराविषयी व स्‍वयंसेवी संस्‍थाच्‍या माध्‍यमातून युवकांमध्‍ये जनजागृती याविषयी अधिकारी व स्‍वयंसेवी संस्‍थांकडून माहिती घेण्‍यात आली. अफिम, चरस, गांजा यासारख्‍या अंमली पदार्थाच्‍या व्‍यापारातून मिळणाऱ्या पैशातून नक्षलवाद, दहशतवाद यांना सहकार्य मिळते. काश्मिरमध्‍ये 100 कोटीपेक्षा जास्‍त मूल्‍य असलेला गांजा थेट मुंबईपर्यंत तसेच नक्षलग्रस्‍त क्षेत्रात अवैधरित्‍या आणल्‍या जात असे, पण या अंमली पदार्थाची छापेमारी करून त्‍यावर नियंत्रण आणण्‍यात केंद्र व राज्य शासनाला यश मिळाले आहे. गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा यासारख्‍या दारूबंदी असलेल्‍या जिल्‍हयांना आता अंमली पदार्थांच्‍या व्‍यापारांनी लक्ष्‍य केले आहे. त्‍यावरही पोलीस प्रशासनाव्‍दारे कार्यवाही केली जात आहे. नागपूर शहरात अंमली पदार्थाच्‍या व्‍यापाराविरूध्‍द कार्यवाही चांगली कामगिरी झाली असून आतापर्यंत या प्रकरणात 600 व्यक्तींना अटक झाली आहे. गांज्‍याच्‍या शेतीला आळा घालण्‍यासाठी व या रोपांची लागवड खुंटण्‍यासाठी ‘नीरी’ तर्फे संशोधन करून या संदर्भातील उपाययोजनाही आखल्‍या जातील, अशी माहिती त्‍यांनी दिली.
तर हुक्का पार्लर बंद करू
हुक्का पार्लर संदर्भात बोलताना त्यांनी सांगितले की, गुजरातने त्यांच्याकडील हुक्का पार्लर बंद करण्याची विनंती केंद्राकडे केली आहे. अशाच प्रकारची मागणी इतर राज्यातून झाल्यास यासंदर्भात कायदा आणता येईल. परंतु, जर एखाद्या ठिकाणी हुक्का पार्लरच्या नावाखाली अंमली पदार्थ विकल्या जात असतील तर पोलिसांना कारवाई करण्याचे अधिकार असल्याचे त्यांनी सांगितले.