Breaking News

एकवीरा देवी मंदिराचा कळस शोधण्यासाठी पोलिसांना १५ दिवसांची मुदत

लोणावळा, १० ऑक्टोबर - कोळी, आगरी बांधवांसह राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या लोणावळ्याजवळच्या कार्लामधील एकवीरा देवीच्या मंदिराचा कळस शोधण्यासाठी मंदिर समितीने पोलिसांना १५ दिवसांची मुदत दिली आहे. १५ दिवसांच्या आत कळस शोधण्यास पोलिसांना अपयश आल्यास दुसरा कळस बसवण्यात येणार असल्याचा इशाराही मंदिर समितीने राज्य सरकाराला दिला आहे. 
३ ऑक्टोबर रोजी पहाटे कळस चोरट्यांनी लंपास केला होता. सुमारे साडेतीन किलो वजनाचा पंचधातूचा कळस असून त्याला सोन्याचा मुलामा दिलेला आहे. त्याची किंमत अंदाजे दोन लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. गडावर सीसीटीव्ही यंत्रणा, बंदोबस्त, मंदिरातील गुरव व कर्मचारी असूनही मंदिराच्या कळसाची चोरी झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे कळस चोरीला गेल्याचा दावा मंदिर समितीने केला आहे.