Breaking News

सत्तावीस वर्षे ट्रेकर्सना साथ देणारी चकदेव पठाराची शिडी

सातारा, दि. 11, ऑक्टोबर - निसर्गाच वरदान लाभलेल्या कोयना - कांदाटी खोर्‍यात सातारा व चिपळूणला जोडणारा सेतू म्हणून परिचित  असलेल्या लोखंडी शिडीला सध्या सत्तावीस वर्षे झाली असून पुन्हा एकदा ट्रेकिंगच्या आवडीमुळे या शिडीचे साक्षीदार असलेल्या बांधकाम  विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी भेट दिली आणि आठवणींना उजाळा मिळाला .
जावळी खोर्‍यातील अतिदुर्गम व मागासलेल्या कोयना-कांदाटी खोर्‍यात कोयना धरणाच्या निर्मितीमुळे शिवसागर जलाशय पसरला आहे  त्यामूळे निसर्गाच्या सानिध्यात अनेक पिढ्या जगणार्या येथील भूमिपुत्र विस्थापित झाले त्यापैकी काही जण कोकण ठाणे रायगड सोलापूर व  सातारा जिल्ह्यात जागा मिळेल त्याठिकाणी राहण्यास गेले पण आजही अनेकजण आपल्या मातृभूमीच्या ओढीने येथील अनेक कार्यक्रमाला  उपस्थित राहतात .
जावळी तालुक्यातील सातारा जिल्ह्याचे शेवटचे टोक म्हणून चकदेव पठाराकडे पाहिले जाते . देशातील सर्वात कमी मतदान केंद्र म्हणून चकदेव  शिंदीची नोंद झाली होती . या पठारावरून पलीकडे चिपळूण तालुक्यात जाण्यासाठी पूर्वी वेलाच्या शिडीचा वापर केला जात होता याव्यतिरिक्त  कोणतेही दळणवळणाचे साधन नव्हते .
या शिडीचा वापर करून येथील ग्रामस्थ चिपळूणला बाजारहाट करण्यासाठी जात होते पण 1990 साली तत्कालीन शाखा अभियंता  डी.एच.पवार यांनी दिवंगत माजी आमदार जी.जी.कदम यांच्या प्रयत्नामुळे वेलाच्या शिडीऐवजी लोखंडी शिडी बसवण्याचा निर्णय घेतला  त्याप्रमाणे 1990 साली चकदेव पठारावर जाऊन लोखंडी शिडीसाठी माप घेतले आणि सातारा येथे शिडी बनवण्याची ऑर्डर दिली . शिडीचा  सांगडा व वेल्डिंगसाठी आवश्यक लागणारी यंत्रणा घेऊन बामणोली पासून लाँच व त्यानंतर डोंगर पठारापर्यंत स्थानिक भूमिपुत्र व क र्मचार्‍यांच्या मदतीने हे साहित्य चकदेव पठारापर्यंत आणले त्याठिकाणी शिडी तयार करून उताराला ही शिडी जोडून घेतली त्यामुळे  चिपळूणला जाणे सोयीस्कर झाले . त्या शिडीला सत्तावीस वर्षे झाल्यानंतर बांधकाम विभागाचे डी.एच.पवार , विजय बोबडे, सुनील चतुर,  शाम मोने,भरत साळुंखे यांच्या सह ट्रेकिंग करणार्या पर्यटकांनी भेट दिली आणि आठवणींना उजाळा मिळाला . ही शिडी लोखंडी कड्यामध्ये  अडकवली गेली आहे . संपूर्ण जंगल परिसर असल्यामुळे या ठिकाणी एकट्याने प्रवास करणे धोक्याचे आहे . पहाटे पाच वाजता सातार्यातून  निघाल्यानंतर चकदेवला जाण्यासाठी दुपार होते . चकदेव येथे जंगम वस्ती असून पूर्वसूचना दिली तर भात व आमटी खाण्यासाठी मिळते .  या ठिकाणी शाळा , आरोग्य सुविधा नसल्यामुळे स्थानिकांच्या मदतीनेच मार्गक्रमण करावे लागते . येथील शंकराच्या मंदिरात दर्शन  घेतल्याने थकवा दूर होतो अशी माहिती पर्यटकांनी दिली. बरेच पर्यटक हे खाद्यपदार्थ घेऊन जातात. माघारी परत येताना दुपारी निघाले तर  रात्री आठ पर्यंत डोंगर पायथ्याशी शिंदी याठिकाणी लाँच मध्ये बसण्यासाठी यावे लागते . तेथून पुन्हा शिवसागर जलाशयातून लाँच ने  बामणोलीला यावे लागते . यावेळी अंधार असल्यामुळे माहितीगार मंडळीस सुखरुप बामणोलीला घेवून जातात.
येथील सामाजिक कार्यकर्ते व कोयना धरणग्रस्त संघटनेचे राम पवार संजय मोरे व अनेक ग्रामस्थ सहकार्य करून पर्यटकांना माणुसकीचेही  दर्शन देतात . सध्या निसर्ग नटलेला असून विविध फुलांचा सडा आठवणीत राहतो त्यामुळे ट्रेकर व पर्यटकांना चकदेव ,शिंदी व वळवण  म्हणजे मिनी काश्मीर भासत आहे . पर्यटन विभागाने या परिसराच्या विकासासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी होऊ लागलेली आहे . या  साठी राज्याचे बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे , आ. मकरंद पाटील , आ. शिवेंद्रराजे भोसले व स्थानिक ग्रामस्थ आणि पुरूषोत्तम जाधव  प्रयत्नशील आहेत.