Breaking News

तर पाकिस्तान जगात नसेल; इन्द्रेशकुमार यांचे प्रतिपादन

नागपूर, दि. 08, ऑक्टोबर - जगाच्या नकाशावर 14 ऑगस्ट 1947 पूर्वी पाकिस्तानचे अस्तित्व नव्हते. पाकिस्तानच्या उचापती अशाच सुरू राहिल्या, तर  भविष्यात पाकिस्तान नकाशावरुन पुसल्या जाईल. चीनदेखील भारतावर वर्चस्व गाजवू पाहत आहे. मात्र चीन व पाकिस्तान यांचे जगात कुणीच मित्र नाहीत व  भारताचे सर्वाधिक देश मित्र आहेत. चीनच्या आर्थिक आक्रमणाला स्वदेशीनेच प्रत्युत्तर देता येईल, असे प्रतिपादन राष्ट्रीय मुस्लिम मंचचे संयोजक इंद्रेश कुमार यांनी  केले.प.पू.कृष्णदास काका माऊली समाधी सेवा मंडळ, खामगाव व कृष्णदास सेवा मंडळ, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने नागपुरात आयोजित व्याख्यानमालेत ते  बोलत होते.
याप्रसंगी इन्द्रेश कुमार म्हणाले की, काँग्रेसने भारताला स्वातंत्र्य नाही तर फाळणीच्या जखमा दिल्या आहेत. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनादेखील फाळणी अमान्य  होती. त्यामुळेच त्यांनी कुठलाही आनंदोत्सव साजरा केला नव्हता किंवा तशी प्रतिक्रियादेखील दिली नव्हती. मात्र तत्कालीन काँग्रेस नेत्यांनी महात्मा गांधी यांना मुख्य  प्रवाहातून बाहेर करत चौकटीबाहेर काढत त्यांना नौव्वाखाली येथे पाठवून दिल्याचा आरोप त्यांनी केला.
आपल्याकडे मुगल व ब्रिटिशांचा इतिहास शिकवला जातो. परंतु, हा भारताचा इतिहास नाही. जर असलाच तर अन्याय, अत्याचार आणि शोषणाचा इतिहास आहे.  त्यामुळे असा इतिहास शिकविण्यात अर्थच नाही. तथाकथित सेक्युलर लोकांनी अकबराला महान बादशहा ठरवले. मात्र, प्रत्यक्षात त्याला तसे म्हणणे म्हणजेच मोठे  ढोंग असल्याचे त्यांनी सांगितले.
आपल्या देशात विद्वान आणि उपदेशक यांचे प्रमाण वाढले आहे. दुसरीकडे संतांचे प्रमाण घटते आहे. यामुळे अनेक समस्या वाढल्या आहेत. विद्वान उपदेश देतात  आणि त्यांच्यामुळे विवाद निर्माण होतात तर संत आचरणातून समजवतात व ते समस्यांवर समाधान सांगतात. देशाला विद्वान व संत दोघांचीही आवश्यकता आहे.  मात्र विद्वानांनी संत होण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे इंद्रेश कुमार म्हणाले.
संतांनी समाजाला भक्तीमार्गासोबतच देशभक्तीचेदेखील संस्कार दिले. अहिंसा व बलिदानाची शक्ती समजावली. लोकवाणी व जनवाणीत संत बोलायचे.  अस्पृश्यतेवरदेखील त्यांनी मौलिक भाष्य केले आहे. आजच्या तारखेत सामाजिक समरसतेची आवश्यकता असून अस्पृश्यता व भेदाभेद मानणे हे पापच असल्याचे मत  त्यांनी व्यक्त केले
आपल्या देशाला संतांची परंपरा लाभली आहे. भ्रष्टाचारमुक्त व्यवस्थेसाठी संतांनी ‘दुसर्‍यांचे धन म्हणजे माती’ या ओळींत उपाय सांगितला आहे. समस्या व आव्हाने  सर्वांसमोरच येतात. मात्र संतांच्या विचारांतूनच अडचणीच्या काळातदेखील आनंदाने जगण्याचे बळ मिळते, असे सांगताना इंद्रेश कुमार यांनी भगवा दहशतवादाच्या  नावाखाली त्यांना फसविण्याचे कसे प्रयत्न झाले याचे अनुभव ही कथन केले.