Breaking News

किटकनाशकांची फवारणी करताना काळजी घ्या!

दाटलेल्या पिकात एकेरी नोझल पंपाचा वापर करावा : कृषि विभागाचे आवाहन

बुलडाणा, दि. 09, ऑक्टोबर - किड व रोग नियंत्रणासाठी रासायनिक किटकनाशकांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. किटकनाशकांची फवारणी करताना  तंत्रज्ञानाचा वापर करणे अत्यावश्यक आहे. फवारणी करणारी व्यक्ती पीक हंगामात दीर्घकाळ किटकनाशकांची फवारणी केल्यामुळे सतत किटकनाशकांच्या संपर्कात  येते. दाटलेल्या पिकांमध्ये शेतमजुर दिवसभर फवारणी करीत असल्याचे दिसुन येते. अशा व्यक्तींमध्ये त्वचेची लर्जी, खाज, सतत डोकेदुखी, अशक्तपणा, मळमळ,  चक्कर येणे, दृष्टी कमी होणे आदी प्रकारची लक्षणे दिसण्याची शक्यता असते. किटकनाशक हाताळणी, साठवणूक व फवारणी करताना शेतकर्‍यांनी काळजी घेण्याचे  आवाहन कृषि विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
फवारणीचे द्रावण तयार करताना अशी घ्यावी काळजी : दाटलेल्या पिकात फवारणी करताना एकेरी नोझल असलेला पंप वापरावा, नेहमी स्वच्छ पाणी वापरावे, गढुळ  पाणी अथवा साचलेल्या पाण्यात फवारणी करू नये, हातमोजे, मास्क, टोपी, प्रान, पुर्ण पँट, गॉगल हे संरक्षण साहीत्य वापरल्याशिवाय द्रावण तयार करू नये,   किटकनाशक शरीराच्या कुठल्याही भागावर पडणार नाही याची काळजी घ्यावी, नाक, कान, डोळे व हात फवारणी होत असलेल्या औषधापासून संरक्षित राहतील,  याची संपूर्ण काळजी घ्यावी, किटकनाशक यांच्या लेबलवरील सुचना समजून घ्याव्यात, गरजेनुसार व गरजे इतकेच द्रावण तयार करावे, दाणेदार प्रकारची औषधे  तशीच वापरावीत, त्यांना पाण्यात विरघळू नये, स्प्रे पंपाची टाकी भरताना औषधे सांडणार नाही याची काळजी घ्यावी, फवारणी संपल्यावर आंघोळ करावी व कपडे  स्वच्छ धुवावे, फवारणी करताना खाणे,पिणे, धुम्रपान करणे, तंबाखू खाणे आदी प्रकार अजिबात करू नये, शिफारस केलेल्या तिव्रतेच्या औषधांचा वापर करावा,  अतितीव्रतेची औषधे वापरले म्हणजे किडरोग नियंत्रणात होतो असे नाही किंबहुना त्यायोगे पर्यावरण व पिकांच्या स्वास्थ्यावर परीणाम होवू शकतो.
हाताळणी करताना घ्यावयाची काळजी : वाहतूक करताना कीटकनाशके स्वतंत्र पिशवीत ठेवावी, बाजारहाट करताना अन्नपदार्थ, जनावरांची वैरण अथवा खाद्यपदार्थ  बरोबर घेवून जावू नये, मोठ्या प्रमाणावर किटकनाशकांचे  पॅकींग डोक्यावर, खांद्यावर अथवा पाठीवर वाहुन नेवू नये,
साठवणूक करताना घ्यावयाची काळजी : किटकनाशके कुलुपबंद ठेवावी, लहान मुलांपासून दूर ठेवावी, सुर्यप्रकाश, पावसाचे पाणी व हवेची झुळुक यांचे संपर्कात  किटकनाशक येणार नाही याची काळजी घ्यावी, किटकनाशके व तणनाशके यांची वेगवेगळी साठवणूक करावी, औषधे मुळ पॅकींगमधून इतर पॅकींगमध्ये ओतून घेवू  नये, औषधे त्यांचे मूळ पॅकींग अथवा वेस्टनात ठेवावी, राहत्या घरामध्ये किटकनाशके ठेवू नये, बाधित व्यक्तिची घ्यावयाची काळजी: विषबाधा झाल्यास बाधीत  व्यक्तीस अपघात स्थळापासून दूर न्यावे, त्याच्या अंगावरील कपडे बदलावे, व्यक्तीला घाम येत असल्यास टॉवेलने पुसून काढावा, श्‍वासोच्छवास योग्य रितीने सुरू  आहे की नाही याची खात्री करावी, व्यक्तीला झटके येत असल्यास त्याच्या दातामध्ये मऊ कापडाची छोटी गुंडाळी ठेवावी, बेशुद्धावस्था असल्यास काहीही खाऊ  घालण्याचे प्रयत्न करू नये, थंडी वाजत असल्यास पांघरून द्यावे, व्यक्तीला पिण्यासाठी दुध तसेच विडी, सिगारेट व तंबाखु देवू नये, शरीर अथवा बाधित भाग  साबणाने  ताबडतोब स्वच्छ करावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी प्रमोद लहाळे यांनी केले आहे.