Breaking News

भाजपचे वारे थांबले; नांदेडमध्ये अशोकपर्वच!

दि. 13, ऑक्टोबर -शहरी भागात भाजपच कायम प्रभावी ठरत असतो. महाराष्ट्रात गेल्या तीन वर्षांत झालेल्या नगरपालिका, महानगरपालिका, नगरपंचायतींच्या निवडणुकीत ते चित्र प्रभावीपणे पुढं आले होते. भाजपनं बहुतांश महानगरपालिका ताब्यात घेतल्या. जनतेतून थेट निवडणूक घेतली, तर त्याचा फायदाही भाजपला मिळतो. ग्रामपंचायत निवडणुका या पक्षीय पातळीवर लढविल्या जात नाहीत; परंतु प्रथमच महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुकीत मिळालेल्या यशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तसंच मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी थेट देशपातळीवर उल्लेख केला. विजयाचे धनी सर्वंच असतात; परंतु पराभवाला कोणीच धनी नसतो, हे जसं काँग्रेसच्या बाबतीत होत होतं, तसंच आता भाजपच्या बाबतीतही व्हायला लागलं आहे. पुणे, भांडूप, भिवंडी, कोल्हापूर आदी ठिकाणच्या पोटनिवडणुकीतील यशाचं श्रेय घ्यायला भाजपचे नेते जसे हिरीरीनं पुढं आले, तसं नांदेड महानगरपालिकेच्या निवडणुकीत पदरी पडलेल्या पराभवाची जबाबदारी घ्यायला कुणीच पुढं आलं नाही. एखादी निवडणूक प्रमाणापेक्षा जास्त प्रतिष्ठेची केली, तर जसं हसं होतं, तसंच भाजपचं नांदेडमध्ये झालं.  लातूर महानगरपालिका ताब्यात आली, परभणीत चांगल्या जागा मिळाल्या म्हणजे नांदेडमध्येही तसंच होईल, असं गृहीत धरण्यात भाजपची चूक झाली. मुख्यमंत्री असताना अशोक  चव्हाण यांच्यावर वृत्तपत्रांनी काढलेल्या विशेष पुरवण्यांचं श्ाुक्लकाष्ठ अजून अशोकराव यांच्यामागं आहे. आदर्श घोटाळ्यांतही त्यांच्यामागं वेगवेगळ्या चौकशांचा ससेमिरा आहे. असं  असलं, तरी लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीतही अशोकरावांनी आपलं वर्चस्व कायम ठेवलं होतं. काँग्रेसशी असलेल्या त्यांच्या निष्ठा कायम आहेत. त्यांच्याकडं प्रदेशाध्यक्षपद  दिल्यानं नारायण राणे यांनी कितीतरी वेळा आकांडतांड़व केलं; परंतु राज्याचं नेतृत्त्व करतानाही नांदेडशी असलेली नाळ त्यांनी कधीही तुटू दिलेली नाही. 
नांदेड महानगरपालिकेच्या निवडणुकीत अशोकराव विरुद्ध इतर सर्व असं चित्र निर्माण झालं होतं. नेमकं निवडणुकीच्याकाळात अशोकरावांच्या मुलींना दिलेल्या दोन सदनिकांचं प्रक रण जाणीवपूर्वक बाहेर काढण्यात आलं. त्यात महसूलमंत्री चंद्रकांत पाटील तोंडघशी पडले. अशोकरावांना जाणीवपूर्वक टार्गेट करण्यात आलं, असं नांदेड़च्या जनतेला वाटलं, तर  त्यात जनतेपेक्षा भाजपच्या नेत्यांचा जास्त वाटा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या दहा मंत्र्यांनी नांदेडमध्ये सभा घेतल्या. शिवसेनेच्या आमदाराला फोडलं. त्यांना  भाजपचा प्रचार करायला लावला. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची नांदेडला सभा झाली. रामदास कदमांसह अन्य मंत्री नांदेडमध्ये ठाण मांडून होते. राणे यांनी चव्हाण  यांच्यावर त्याचवेळी सडकून टीका केली होती. भाजपचा विजयाचा वारू कुणालाच रोखता येणार नाही, असं वातावरण तयार करण्यात आलं होतं. हे सारं होत असताना अशोकराव  मात्र नांदेडमध्ये तळ ठोकून होते. वर्षानुवर्षे नांदेडशी, तेथील माणसांशी ऋणानुबंध जुळलेल्या अशोकरावांना तेथील राजकीय गणितं पक्की माहीत होती. सर्व बाजूंनी घेरलं जात  असताना त्यांनी कुणावरही व्यक्तिगत टीका केली नाही. काँग्रेसच्या ताब्यात महापालिकेच्या स्थापनेपासून सत्ता असताना तिथं केलेल्या कामांवर त्यांनी जोर दिला. मुख्यमंत्र्यांनी  नागपूरच्या रस्त्यांची आणि नांदेडच्या रस्त्यांची तुलना केली; परंतु लोकांचा त्यांच्यापेक्षा अशोकरावांवर विश्‍वास होता. केवळ विकास हाच विजयाचा निकष नसतो. लोकांच्या  सुखदु:खात धावून जावं लागतं. त्यांच्यांशी भावनिक नातं निर्माण करावं लागतं. अशोकरावांचे नांदेडशी दैनंदिन संबंध आहेत. एक दिवस येऊन जाणार्‍यांवर कितपत विश्‍वास ठेवायचा,  असा विचार लोकांनी केला असावा. इतके आरोप-प्रत्यारोप, प्रतिकूल परिस्थिती असताना लोकांनी अशोकरावांच्या पदरात भरभरून मतदान टाकलं.
गेल्या वेळच्या निवडणुकीची तुलना केली, तर भाजपचं वारं असताना काँग्रेसनं नांदेडमध्ये ते थांबविलं एवढंच नाही, तर काँग्रेसच्या जागा 29 नं वाढल्या. सारी शक्ती पणाला लावूनही  भाजपला एका हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच जागा मिळाल्या. शिवसेनेची अवस्था पनवेलसारखी झाली. राष्ट्रवादीचं महाराष्ट्रात वारंवार पानिपत होऊनही जिथं आपली ताकद  कमी आहे, तिथं काँग्रेससमोर नमतं घेऊन काही जागा पदरात पाडून निवडून आणायचं सोडून एकला चलो रे खुमखुमी येते. अशी खुमखुमी मग अंगलट येते. राणे यांनी एमआयएम  आणि काँग्रेसची आतून हातमिळवणी असते, असा हास्यास्पद आरोप करून स्वत:चंच हसू करून घेतलं आहे. महाराष्ट्राच्या राजकीय क्षितीजावर एमआयएमचा उदय गेल्या वेळच्या  नांदेड महानगरपालिकेच्या निवडणुकीपासून झाला होता. दहापेक्षा जादा जागा मिळवणार्‍या या पक्षाला या वेळी खातं ही खोलता आलेलं नाही. हे लक्षात घ्यावं लागेल. नांदेड हा काही  मुस्लीम बहुसंख्य असलेला प्रदेश नाही. तिथं अजूनही सत्तर टक्क्यांहून अधिक हिंदू आहेत. हिंदू-मुस्लीम मतांचं ध्रुवीकरण झालं असतं, तर त्याचा फायदा भाजपला आणि  एमआयएमला झाला असता; परंतु तसं झालेलं नाही. देशभर काँग्रेसची पिछेहाट होत असताना नांदेडसारखी काही बेटं काँग्रेसमुक्त भारताचं मोदी व अमित शहा यांचं स्वप्न पूर्ण होऊ  देत नाहीत. तसंच काँग्रेसच्या धीर गमावून बसलेल्या कार्यकर्त्यांच्या मनात आशेची पालवी फुलवतात. नांदेडमध्ये घवघवीत यश मिळविल्यानंतरही अशोकरावांचे पाय जमिनीवरच  आहेत. त्यांनी कुणावरही व्यक्तिगत टीका, आरोप केले नाहीत. केंद्र आणि राज्यात सत्तेत असलेल्या भाजपचा परतीचा पˆवास महाराष्ट्रातून सुरू झाला आहे. त्याची सुरुवात  नांदेडमधील महानगरपालिकेच्या निकालातून झाली आहे, असं त्यांनी म्हटलं असलं, तरी त्यांना वस्तुस्थितीची जाणीव आहे. चव्हाण म्हणाले, की नांदेड-वाघाळा महानगरपालिके च्या निवडणुकीत नांदेडकरांनी भाजपाच्या खोटया पˆचाराला धुडकावलं. जनतेनं काँगˆेसच्या कामांवर विश्‍वास दर्शवला. आज मिळवलेल्या विजयामध्ये काँगˆेसच्या कार्यकर्त्यांचा वाटाही  मोठा आहे. नांदेडमध्ये भाजपनं फोडाफोडीचं राजकारण केलं. काँगˆेसचे सहा नगरसेवक फोडले; मात्र ते सर्व नगरसेवक पराभूत झाले आहेत. भाजाचं फोडाफोडीचं राजकारण  मतदारांनी नाकारलं आहे. नांदेड आणि त्याआधी परभणी, मालेगाव, भिवंडी आदी महानगरपालिकांच्या निवडणुकीत काँगˆेसनं यश मिळवून भाजपला पर्याय आहे, असं दाखवून दिलं  आहे. राणेंनी भाजप नेत्यांना आत्मपरीक्षण करण्याच्या दिलेल्या सल्ल्याचा धागा पकडत चव्हाण यांनी याचा विचार भाजपा नेत्यांनी केला पाहिजे, असा चिमटा काढला. नांदेडमध्ये  व्हीव्हीपॅट मशीनचा वापर करण्यात आला. त्यामुळं कुणाला मतदान केलं. याचा पुरावा मतदारांकडं येत होता. या मशीन देशभर वापरल्या गेल्या, तर मागच्या महापालिका, नगरपा लिका निवडणुकीच्या वेळी जनतेच्या मनात जशी शंका होती, तशी शंका राहणार नाही.