0
रायगड, दि, 12, ऑक्टोबर - श्री शिव राजाभिषेक दिनोत्सव सेवा समिती, दुर्गराज रायगड ही संस्था गेली 21 वर्षे छत्रपति शिवाजी महाराजांचा राजाभिषेक दिन तिथी प्रमाणे साजरा करीत  आहे. मराठ्यांनी पुन्हा उठाव करू नये म्हणून इंग्रजांनी 19 व्या शतकात मराठ्यांच्या अस्मितेचे प्रतिक दुर्गराज रायगड अंधारात लोटला. तेव्हा पासून जवळपास शतकभर शिवरायांचा नंदादीप  अज्ञातात राहिला. पुढे लोकमान्य टिळक व ज्योतीराव फुले यांनी त्याच्या वाटा पुन्हा शोधून काढला. तरीही, गुलामगिरीच्या जोखड्यात बांधली गेलेली जनता जागी झाली नाही! दुर्गप्रेमी- शिवप्रेमींनी गडाच्या वाट्या जागत्या ठेवल्या, पण 32 मणांचे सोन्याचे सिंहासन मस्तकी मिरवलेला हा अभेद्य किल्ला अंधारातच रहिला. 
1995 साली छत्रपतींच्या राजाभिषेकाच्या निमीत्ताने एक चळवळ सुरु झाली व आज तिने भव्य स्वरूप घेतले आहे. शिवचैतन्य सोहळा - दिवाळीची एक पहाट, रायगडी मशालींचा थाट !  छत्रपति शिवाजी महाराज ’हिंदवी स्वराज्या’चे कर्ते झाले व यावनी अराजक व जुलमी धर्मांध सत्तेखाली भरडलेल्या रयतेने सुटकेचा नि:श्‍वास सोडला! आपल्या देशात आपले राज्य आले,  स्वराज्य आले. आता सणवार, व्रतवैकल्ये करायला कोणाची भीती राहिली नाही. थोरल्या महाराज साहेबांच्या कारकिर्दीत रयत सुखात, आनंदात व जल्लोषात सण-उत्सव साजरे करू लागली.  छत्रपतीही गोरगरीब रयतेला दिवाळीला अनुदान देत असत, सारा गड मशालींच्या प्रकाशाने उजळून निघे! मावळे व हुजुरातीचे वीर ’सरकारा’तून गोडधोड खात असत. काळाची चक्रे फिरली,  इंग्रजी सत्तेचे सावट भारतावर पसरले आणि हिंदुस्तानचे साम्राज्याचे प्रतिक असलेला हा नंदादीप कायमचा अंधारात लोटला गेला.
आपण आपल्या घरी दिवाळी साजरी करायची आणि जिथे हिन्दवी स्वराज्याचं सार्वभौम सिहासन झळाळले, तो रायगड किल्ला मात्र अंधारात खितपत पडू द्यायचा? हे हाडाच्या शिवभक्तांना  मुळीच पाटण्या सारखे नव्हते! दिवाली की एक शाम, अपने शिवछत्रपती के नाम, या समितीच्या हाकेला शेकडो शिवभक्तांची साद मिळाली ! फटाके उडवून हजारो रूपये धूरात घालवण्या  पेक्षा एक रात्र रायगड उजळून टाकण्यात सत्कारणी लावावी. आपल्या राजाचा मान राखावा. आपल्या संस्कृतीचा मान राखावा, असा बेत समितीच्या शिलेदारांनी 2012 सालापासुन अमलात  आणला. हिंदूचे तक्थ रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने उदयास आले. मराठ्यांना , अखंड हिंदुस्थानला छत्र मिळाले, राजा मिळाला. या वर्षी तिथीनुसार ज्येष्ठ शु. त्रयोदशी  ला राजाभिषेक शक 344 सुरु झाले आहे. जितकी वर्षे छत्रपति शिवाजी महाराजांच्या राजाभिषेकाला झाली, तितक्या मशाली प्रज्वलित करून या जाणत्या राजाला मानाचा मुजरा द्यायचा,  कृतज्ञता व्यक्त करायची. म्हणूनच या वर्षी 344 मशाली प्रज्वलित करण्याचा विनम्र अट्टाहास! ज्या मावळ्यांनी, सरदारांनी व ज्ञात-अज्ञात वीरांनी आपल्या घरादारावर पाणी सोडून, संसार  वार्यावर सोडून व प्रसंगी प्राणांची बलिदाने देऊन आपला देव, देश आणि धर्म राखला त्यांच्या सन्मान प्रित्यर्थ आधी मशाली प्रज्वलित करायच्या. वासूबारसच्या प्रभातसमयी श्री जग दिश्‍वराच्या गाभारयात, शिरकाई देवी जवळ, नागारखान्यासमोर आणि राजदरबारात दीपोत्सव करायचा व मगच आपल्या घरी पहिली दिवा लावायचा. असा पण समितीच्या शिलेदारांनी केला  आहे. दीपावलीच्या निम्मिताने गडावर राहणार्‍या लोकांना फराळ वाटप व रायगड परिसरातील शालेय विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तूंचे वाटप समितीमार्फत करण्यात येणार आहे. सोहळयासाठी  उपस्थित राहणार्‍या सर्व शिवभक्तांच्या रविवारच्या भोजनाची व्यवस्था समितीमार्फत करण्यात येणार आहे. तरी सर्वांनी मराठमोळ्या वेशात, जल्लोषात हा शिवचैतन्य सोहळा साजरा करण्यासाठी  किल्ले रायगडावर यावे असे आवाहन समितीचे अध्यक्ष श्री सुनील पवार यांनी केले आहे. 

Post a Comment

 
Top