Breaking News

शिक्षकांना केवळ शैक्षणिक कामेच द्यावीत : आ. निरंजन डावखरे

मुंबई, दि. 09, ऑक्टोबर - शिक्षक हे नवी पिढी घडवतात. त्यामुळे शिक्षकांना केवळ शैक्षणिक कामेच दिली जायला हवीत. शिकवण्याव्यतिरिक्त इतर कामे देऊन  त्यांच्यावरील दडपण वाढवू नये, अशी मागणी कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार निरंजन डावखरे यांनी सरकारकडे केली. समन्वय शिक्षक प्रतिष्ठानतर्फे ठाणे  येथील शहनाई हॉलमध्ये आयोजित कोकण विभागातील आदर्श शिक्षकांच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. या कार्यक्रमाला कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार  बाळासाहेब पाटीलदेखील उपस्थित होते. 140 गुणवान शिक्षकांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
‘शिक्षकांवर कामाचा प्रचंड ताण असतो. तशातच त्यांना शिकवण्याच्या कामाबरोबर इतर कामेदेखील दिली जातात, हे अत्यंत चुकीचे आहे. अशा कामांसाठी वेगळी  यंत्रणा उभी करावी. शिक्षकांवर शैक्षणिक कामाव्यतिरिक्त इतर कामे लादू नयेत. शिक्षकांच्या समस्यांबाबत सरकारने गांभीर्याने विचार करून शिक्षकांना दिलासा द्यावा,  असेही श्री. डावखरे म्हणाले.
या कार्यक्रमात आ. बाळासाहेब पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की, राज्य सरकारने शिक्षण खात्याचा बट्याबोळ केला आहे. शिक्षकांच्या दृष्टीने  ही धोक्याची घंटा आहे. अगदी अंगणवाडीपासून ते वैद्यकीय क्षेत्रांसाठीच्या प्रवेश परीक्षांपर्यंतचा कारभार हा दयनीय आहे. मुंबई विद्यापीठाच्या पेपर तपासणीतील  गोंधलाबाबत बोलायचे झाले तर राज्याची शिक्षण व्यवस्था कुठे चालली आहे, असा प्रश्‍न पडतो. शिक्षकांच्या प्रश्‍नावर विचार करण्यासाठी 16 सदस्यांची समिती तयार  केली गेली आहे, मात्र त्या समितीत भाजपाचे लोक असूनही सरकार त्यांच्या सूचनांचा विचार करीत नाहीत. यावरून सरकारची उदासीनता लक्षात येते.