Breaking News

रेल्वे प्रवाशांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रसंगी कायदा हातात घेऊ; राज ठाकरे यांचा इशारा

मुंबई, दि. 05, ऑक्टोबर - मुंबईतील रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांना 15 दिवसांत हटवले नाही तर मनसेचे कार्यकर्ते फेरीवाल्यांना हटवतील यातून जे  काही होईल त्याला रेल्वे जबाबदार असेल असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आज येथे दिला. एल्फिन्स्टन रोड स्थानकावरील दुर्घटनेचा  निषेध करण्यासाठी मनसेतर्फे आज संताप मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चापुढे ते बोलत होते.
रेल्वे प्रवाशांचे प्रश्‍न न सुटल्यास यापुढचा मोर्चा शांततापुर्ण असणार नाही असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. आपल्या भाषणात त्यांनी मोदी सरकारवर जोरदार  टीका केली. अनेक आश्‍वासने देवून सत्तेवर आलेले ते सरकार जनतेचे प्रश्‍न सोडवण्यात अपयशी ठरले आहे. त्यामुळेच आता सामान्य माणूस या सरकारविरोधात बोलू  लागला आहे, असेही ते म्हणाले.
मुंबई अहमदाबाद या महत्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्पावर राज ठाकरे यांनी जोरदार टिका केली. या प्रकल्पासाठी एक लाख 10 हजार कोटींचे कर्ज काढले जाणार  आहे. मात्र हा प्रकल्प मुठभर गुजराती लोकांसाठी आहे. मुंबई काबीज करण्याचे अनेक वर्षांचे स्वप्न बुलेट ट्रेनच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा हा गुजराती डाव आहे,  असा आरोपही त्यांनी केला.
रेल्वेचे अनेक प्रश्‍न वर्षानुवर्षे सोडवले जात नाहीत. याचे कारण रेल्वे प्रशासन सामान्य प्रवाशाला किंमतच देत नाही. सरकार बदलले तरी पुर्वीचेच प्रश्‍न कायम राहिले  आहेत. विरोधात असताना या गोष्टींना मोदी विरोध करत होते. त्याच गोष्टी आता केल्या जात आहेत. त्यामुळेच जनतेत संताप वाढतो आहे. मोदी सरकारविरोधातील  या संतापाला प्रसारमाध्यमांनी वाचा फोडावी, असे आवाहनही राज ठाकरे यांनी यावेळी केले.