Breaking News

सातारा जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपासून परतीच्या पावसाने थैमान

सातारा, दि. 11, ऑक्टोबर -  जिल्ह्यात गेल्या पांपासून परतीच्या पावसाने थैमान घातले असून याचा सर्वाधिक फटका पिकांना बसला  आहे. फलटण, खटाव तालुक्यात सोयाबीन, ऊस, बाजरी तर वाई तालुक्यात भात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकर्‍यांवर  आर्थिक संकट ओढवले आहे.
दुष्काळी माण, खटाव, फलटण व कोरेगाव तालुक्यात पावसाळा संपत आला तरी मान्सूनने पाठ फिरवली होती. पाऊस पडण्याची आशा  धुसर झाली असतानाच गेल्या पंधरा दिवसांपासून दुष्काळी तालुक्यांसह बहुतांश ठिकाणी परतीच्या पावसाने हजेरी लावली. खटाव व  फलटण तालुक्याला गेल्या पाच दिवसांपासून पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे.
या पावसामुळे ओढे, नाले, बंधारे पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागले आहेत. दुष्काळी तालुक्यांमध्ये मुबलक पाणीसाठा झाल्याने ग्रामस्थांमध्ये  आनंदाचे वातावरण आहे. मात्र, दुसरीकडे पिके उद्ध्वस्त झाल्याने शेतकर्‍यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
हातातोंडाशी आलेली बाजरी, सोयबीन, ऊस या पिकांचे शेतात पाणी साचल्याने नुकसान झाले. तर वाई तालुक्यात भात पिकाला पावसाचा  सर्वाधिक फटका बसला. भात पीक भुईसपाट झाल्याने शेतकरी हवालदील झाले आहेत.