Breaking News

राज ठाकरेंची पंतप्रधान मोदींवर व्यंगचित्राच्या माध्यमातून टीका

मुंबई, दि. 03, ऑक्टोबर - राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे निमित्त साधून ‘मनसे’ अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली आहे.  राज यांनी व्यंगचित्र काढून ते फेसबुकवरील अधिकृत खात्यावर प्रसिद्ध केले आहे.
या व्यंगचित्रात महात्मा गांधी आणि नरेंद्र मोदी दोघेही समोरासमोर उभे असल्याचे दाखवले आहे. चित्रात कोप-यात ‘एकाच मातीतील दोघे’ असे लिहिले आहे.  कारण गांधीजी आणि पंतप्रधान मोदी हे दोघेही मूळ गुजरातचे आहेत. या चित्रात गांधीजींच्या हातात ’सत्याचे प्रयोग’ हे त्यांचे आत्मचरित्र आहे, तर मोदींच्या  हातातील पुस्तकावर ‘माझे असत्याचे प्रयोग’ असे लिहिलेले आहे. या चित्रातील वेगळेपण म्हणजे, नेहमी चित्राच्या उजव्या खालील कोप-यात आपली स्वाक्षरी  करणा-या राज यांनी या चित्रात जाणूनबुजून उजव्या (मोदींच्या) बाजूला स्वाक्षरी न करता गांधीजींच्या बाजूला स्वाक्षरी केली आहे.
दोन दिवसांपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत राज यांनी मोदी यांना ‘खोटारडे पंतप्रधान’ म्हटले होते. त्यातच आज लगेच व्यंगचित्रातूनही ही टीका करण्यात आली  आहे.