Breaking News

हज यात्रेबाबतचे नवे धोरण शनिवारी जाहीर होणार

मुंबई, दि. 06, ऑक्टोबर - दरवर्षी लाखोंच्या संख्येने मक्केला जाणा-या मुस्लीम भाविकांसाठी हज यात्रेचे धोरण उद्या (7 ऑक्टोबर) जाहीर करण्यात येणार आहे.  केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी उद्या मुंबईतील हज हाऊस येथे दुपारी 1 वाजून 45 मिनिटांच्या सुमारास या संबंधीचे धोरण जाहीर करणार आहेत.
दरवर्षी सौदी अरेबियातील मक्का या शहरात हज यात्रा भरवली जाते. इस्लामी दिनदर्शिकेनुसार 12वा महिना म्हणजेच अल-हिज्जाह या महिन्यात भरणारी ही यात्रा  पवित्र मानली जाते. या यात्रेसाठी भारतातून दरवर्षी लाखो मुस्लीम भाविक जातात व त्यांचासाठी ठराविक रक्कम केंद्र सरकारकडून निधी म्हणून देण्यात येते. त्या  संबंधीचे धोरण जाहीर करण्यासाठीच नक्वी मुंबईत येणार आहेत.
जलमार्गाद्वारे हज यात्रा पुन्हा सुरु करण्याचा सरकार विचार करत आहे. जलमार्गाद्वारे जेद्दा येथे जाण्याचा मार्ग 1995 मध्ये बंद झाला होता. पण, जलमार्गाद्वारे  हजयात्रेच्या पर्यायामुळे प्रवासाचा खर्च निम्म्याहून कमी होणार आहे. त्यामुळे यंदाच्या हज धोरणात जलमार्गाची वाहतूक पुन्हा सुरू होणार का, याकडे मुस्लीम बांधवांचे  लक्ष लागले आहे.