Breaking News

हिमायतबाग गोळीबार प्रकरणात दोघा दहशतवाद्यांना दहा वर्षे सक्तमजुरी

औरंगाबाद, दि. 04, ऑक्टोबर - येथील हिमायतबाग येथे 26 मार्च 2012 रोजी मध्यप्रदेशातून येवून लपून बसलेल्या दहशतवाद्यांना पकडण्यासाठी गेलेल्या  दहशतवादविरोधी पथकावर गोळीबार करणा-या दोन दहशतवाद्यांना आज जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा  ठोठावली. या प्रकरणातील दोन आरोपींना न्यायालयाने पुराव्यांआभावी निर्दोष मुक्त केले आहे.
अतिरेक्यांशी हिमायतबाग येथे झालेल्या या चकमकीत त्यावेळी अहमदाबाद बॉम्ब स्फोटातील संशयित आरोपी खलील उर्फ अझहर हा ठार झाला होता. सिमीशी  संबंधित अतिरेकी हिमायतबाग येथे येणार असून त्यांची गुप्त बैठक होणार असल्याची माहिती एटीएसला मिळाली होती. त्या आधारे तत्कालीन पोलिस आयुक्त  संजयकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली एटीएसचे अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांनी सापळा रचला. तेथे असलेल्या अतिरेक्यांनी पोलिसांची चाहूल लागताच पोलिसांवर  गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात अतिरेकी खलील उर्फ अजहर ठार झाला होता. दुसरा एक दहशतवादी शाकीर हुसेन  याला पायाला गोळी लागून तो जखमी अवस्थेत पोलिसांच्या हाती लागला होता. नंतरच्या तपासात पोलिसांनी सिमीशी संबंधित अबरार ला अटक केली होती. या  चकमकीत पोलिसांचा एक शिपाई जखमी झाला होता. यावेळी पाठलाग करून एटीएसने अतिरेकी अबरार ऊर्फ मुन्ना ऊर्फ ईस्माईल ऊर्फ अब्दुल बाबूखान (रा.  चंदननगर, इंदौर, मध्यप्रदेश) यास पकडले होते. नंतर पोलिसांनी अन्वर हुसेन (रा. लाभारिया, इंदौर, मध्यप्रदेश) याला गजाआड केले होते. त्यांच्याकडून 4 गावठी  कट्टे, 2 रिव्हॉल्व्हर, 17 जिवंत काडतुसे हस्तगत केली होती.
या प्रकरणाचा तपास पूर्ण करून पोलिसांनी न्यायालयामध्ये आरोपपत्र दाखल केल्यनंतर जिल्हा न्यायालयाने अवघ्या 16 दिवसांत या प्रकरणाची सुनावणी पूर्ण केली.  नंतर सहाच दिवसानंतर आज या प्रकरणी निकाल दिला असून मोहम्मद अबरार उर्फ मुन्ना उर्फ इस्माईल अब्दुल बाबुखाँ आणि मोहम्मद शाखेर हुसेन उर्फ खलील  अखिल खिलजी या दोन आरोपींना दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व पंधरा हजार रूपयांचा दंड ठोठावला आहे.