Breaking News

आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत रत्नागिरीची ऐश्‍वर्या आचार्य प्रथम

रत्नागिरी, दि. 04, ऑक्टोबर - लांजा कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाने आयोजित केलेल्या नाना वंजारे स्मृती आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत  रत्नागिरीतील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या ऐश्‍वर्या आचार्य हिने प्रथम क्रमांक पटकाविला. लांजा महाविद्यालयाने सांघिक विजेतेपद पटकाविले.
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या या स्पर्धेला स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्पर्धेत शिवार आंबेरे  येथील शामराव पेजे महाविद्यालयाच्या समिधा माळी हिने द्वितीय, तर लांजा महाविद्यालयाच्या विशाखा पावसकर व सिद्धी माने या दोघींनी तिसरा क्रमांक पटकावला.  विजेत्यांना अनुक्रमे 1001 रुपये, 701 रुपये 501 रुपयांची पारितोषिक आणि ग्रंथ, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले. सांघिक विजेतेपद पटकाविणार्‍या लांजा  महाविद्यालयाला स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र देण्यात आले.  स्पर्धेचे बक्षीस वितरण लांजा न्यू एज्युकेशन सोसायटीचे सल्लागार विजय बेर्डे, उपप्राचार्य काशिनाथ चव्हाण,  स्पर्धा संयोजक प्रा. महेश बावधनकर, खावडी विद्यालयाचे मुख्याध्यापक डी. डी. देसाई आदी उपस्थित होते.