Breaking News

भेसळीच्या संशयावरून साडे तीन लाखाचा खवा व बर्फी जप्त

सांगली, दि. 07, ऑक्टोबर - दीपावलीच्या पार्श्‍वभूमीवर सांगली शहरात विक्रीसाठी आलेला तीन लाख 57 हजार रूपये किंमतीचा खवा व स्पेशल बर्फी चा तब्बल एक हजार 690 किलोचा साठा अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त शिवानंद कोडगिरे यांच्या नेतृत्वाखालील सांगली जिल्हा अन्न प्रशासनाने शुक्रवारी पहाटे जप्त केला. या खाद्यपदार्थाची वाहतूक व साठवणूक अतिशय चुकीच्या पध्दतीने होत असल्यानेच ही कारवाई करण्यात आली आहे. या खवा व बर्फीत भेसळ आहे का, याची तपासणी करण्यासाठी नमुने घेण्यात आल्याची माहिती शिवानंद कोडगिरे यांनी दिली.
भेसळयुक्त खवा व बर्फीची एसटीच्या माध्यमातून सांगली शहरात छुप्या पध्दतीने मोठ्याप्रमाणात आवक होत असल्याची माहिती शिवानंद कोडगिरे यांना मिळाली होती. या माहितीआधारे शिवानंद कोडगिरे यांच्या नेतृत्वाखाली अन्न सुरक्षा अधिकारी रोहन शहा, ए. ए. पवार, द. ह. कोळी, आर. पी. पाटील, एस. एस. हाक्के, नमुना सहाय्यक तानाजी कवाळे व चंद्रकांत साबळे यांच्या पथकाने गुरूवारी मध्यरात्रीपासून सांगली येथील मुख्य बसस्थानक परिसरात सापळा लावला होता.
शुक्रवारी पहाटेच्या सुमारास हिंगोली- कोल्हापूर या एसटीतून सुमारे 200 किलो खवा आला. हा खवा जप्त करून हा खवा घेण्यासाठी आलेल्याकडे चौकशी केली असता असाच खवा व बर्ङ्गी एसटीच्या पार्सल कार्यालयातही असल्याची माहिती पुढे आली. त्याआधारे पार्सल कार्यालयात छापा टाकून 1490 किलो खवा व बर्फी जप्त करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या खव्यावर इंडियन मिल्क स्वीट, तर बर्फीवर राधाकृष्ण बर्फी, गायत्री बर्फी व राधे बर्फी असा उल्लेख आहे. प्राथमिक तपासाअंती या खवा व बर्फीत भेसळ असल्याचा संशय आल्यानंतरच ही सर्व मिठाई जप्त करण्यात आलेली आहे.
हा खवा व बर्फी सांगली शहरातीलच प्रज्वल जाधवर, संजय तोरडमल व अमोल जातवर यांच्यासह अन्य दहा व्यावसायिकांनी मागविल्याची माहिती सामोरी आली आहे. यातील तिघा व्यावसायिकांना तात्काळ बोलावून घेऊन त्यांच्यासमोर खवा व बर्फीचे सहा नमुने घेण्यात आले. हे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच पुढील कारवाई केली जाणार आहे. हा खवा व गायत्री व राधे बर्फी याचे उत्पादन गुजरात राज्यात, तर राधाकृष्ण बर्फीचे उत्पादन पुणे येथे होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या संबंधित व्यावसायिकांनाही लवकरच चौकशीसाठी बोलाविण्यात येणार असल्याचे शिवानंद कोडगिरे यांनी सांगितले.
दरम्यान, दूध अथवा दुग्धजन्य पदार्थांची एसटीद्वारे वाहतूक करता येत नाही. त्यामुळे या वाहतूकप्रकरणी एसटी महामंडळास नोटीस पाठविण्यात आली आहे. याप्रकरणी सखोल तपास केला जाणार असून संबंधितांवर अन्न सुरक्षा व मानदे कायद्यातर्ंगत कठोर कारवाई केली जाणार असल्याचेही शिवानंद कोडगिरे यांनी सांगितले.