Breaking News

अपेडा ऍप शेतकर्‍यांना ठरणार आधार

। ऑनलाईन प्रणालीद्वारे नोंदणी करणे बंधनकारक, माल निर्यात होणार सोपी

अहमदनगर, दि. 06, ऑक्टोबर - शेतकर्‍यांना परदेशात आपला माल त्वरेने पाठविता यावा, यासाठी सरकारने शेतकर्‍यांसाठी खास अपेडा फार्मर कनेक्ट हे अ‍ॅप तयार केले आहे. ते शेतकर्‍यांना मोठे फायदेशीर ठरणार आहे. नगर जिल्ह्यात याची अंमलबजावणी होण्यासाठी कृषी विभाग व प्रशासन काम करीत आहे.
जिल्ह्यामधील शेतकरी द्राक्षे, डाळिंब,भाजीपाला आदींचे चांगल्याप्रकारे उत्पादन  घेत  आहेत. त्याचप्रमाणे त्यांची निर्यातही  शेतकरी करू लागला आहे. युरोपियन व अन्य देशांत यांना चांगली मागणी आहे. परंतु आता युरोपियन व अन्य देशांनी द्राक्षे, डाळिंब, आंबा व भाजी या पिकांच्या निर्यातीकरिता निर्यातक्षम बागांचे ग्रेपनेट, अनारनेट व व्हेजनेट या ऑनलाइन प्रणालीद्वारे नोंदणी करणे बंधनकारक केले आहे. ही प्रक्रिया शेतकर्‍यांना सोपी  व्हावी व निर्यात विना अडथळा पार पडावी यासाठी अपेडाद्वारे अपेडा फार्मर कनेक्ट हे मोबाइल ऍप तयार करण्यात आले आहे.  निर्यातक्षम बागांसाठी  अपेडा ऍपचा शेतकर्‍यांना चांगला आधार मिळणार आहे.
 युरोपियन देशांना निर्यात करण्याकरिता नोंदणी करण्यात आलेल्या द्राक्ष बागांची तपासणी करण्याकरिता संबंधित मंडल कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक यांना तपासणी अधिकारी म्हणून प्राधिकृत करण्यात आले आहे. निर्यातक्षम द्राक्ष बागांमधील  उर्वरित अंशनियंत्रणाकरिता शेतकर्‍यांना मार्गदर्शन करण्यासाठी दोन तपासण्या विहित करण्यात आलेल्या आहेत. पहिली तपासणी द्राक्ष बागेची नवीन नोंदणी प्रमाणपत्र देण्यापूर्वी करावयाची आहे. दुसरी तपासणी माल काढण्यापूर्वी एक महिना अगोदर करावयाची आहे. निर्यातक्षम द्राक्ष बागांची तपासणी करण्याकरिता प्रपत्र-4  अ व ब विहित करण्यात आलेले आहे.
त्या विहित केलेल्या प्रपत्रामध्ये संबंधित नोंदणीकृत द्राक्ष बागांची तपासणी अधिकार्‍याने करून त्याचा अहवाल संबंधित  नोंदणीकृत द्राक्ष बागायतदारांना देऊन त्याची माहिती अपेडाच्या संकेतस्थळावर तालुकास्तरावर ग्रेपनेटवर भरावयाची आहे.
 ग्रेपनेट व अनारनेटच्या सुविधा वर्षभर सुरू राहणार असून  ज्या शेतकर्‍यांना नोंदणी करणे शक्य नाही. त्यांनी संबंधित तालुका कृषी अधिकार्‍यांकडे जाऊन ऑनलाइन बागांची नोंद करावी असे,  कृषी विभागाचे तंत्र अधिकारी आणि  निर्यातकक्षाचे प्रमुख आर. के. गायकवाड यांनी सांगितले.या ऍपवर आधार, मोबाइल क्रमांक, ईमेल आदींची  नोंदणी  करावी लागते. एकदा नोंदणी  झाल्यास ,  डाळिंब, आंबा आदी  फळे तसेच  भेंडी, कारली, वांगी, मिरची, दुधी भोपळा, शेवगा, गवार इत्यादी भाजीपाला पिकांच्या निर्यातक्षम शेतांची नोंदणी  करता येते. असे गायकवाड यांनी सांगितले. तसेच मोबाइलद्वारे  निर्यातक्षम    बागांची ऑनलाइन नोंदणी करताना अपेडाच्या  संकेतस्थळावरून किंवा प्ले स्टोअरमधून  हे ऍप उत्पादकांनी आपल्या मोबाइलवर डाऊनलोड करून घ्यावे.