Breaking News

आयआरसीटीसीतर्फे रेल्वे प्रवाशांसाठी भारत दर्शन सुविधा

पुणे, दि. 13, ऑक्टोबर - इंडियन रेल्वे केटरिंग अ‍ॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड (आयआरसीटीसी) च्या वतीने रेल्वे प्रवाशांसाठी भारत दर्शनची सुविधा उपलब्ध करून देण्यात  आली आहे. पुणे, कोल्हापूर, नाशिक व सावंतवाडी येथून पाच भारत दर्शन विशेष रेल्वे सोडण्यात येणार असून त्यातील चार रेल्वे पुणे मार्गे धावणार आहेत. दि. 23 ऑक्टोबर रोजी  पुण्यातून कटरा येथील माता वैष्णोदेवी व अमृतसरसाठी रेल्वे सोडण्यात येणार असून प्रती प्रवासी 7560 रुपये भाडे असून सात रात्री व आठ दिवसांची सहल असणार आहे.
दि. 2 नोव्हेंबर रोजी नाशिकहून दक्षिणेतील मदुराई येथे रेल्वे सोडण्यात येणार असून ती पुणे मार्गे जाणार आहे. सावंतवाडी येथून दि. 13 नोव्हेंबर रोजी वैष्णोदेवीकरिता रेल्वे सोडली  जाणार असून ती पुणे मार्गे जाणार नाही. दि. 24 नोव्हेंबर रोजी कोल्हापूर येथून उदयपूर, जयपूर, अजमेर, आग्रा, मधुरा, हरिद्वार, अमृतसर, कटरासाठी रेल्वे सोडली जाणार असून  प्रती प्रवासी 11 हजार 340 रुपये भाडे असणार आहे. ही रेल्वे पुणे मार्गे जाणार आहे.तर दि. 8 डिसेंबर रोजी पुण्यातून पुरी, कोणार्क, भुवनेश्‍वर, कोलकाता, गंगासागर करिता रेल्वे  सोडली जाणार असून प्रती प्रवासी 8505 रुपये भाडे आहे. 15 कोचच्या या सर्व रेल्वे असून सुरक्षा, खानपान, स्वच्छतेला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे आयआरसीटीसीच्या  वतीने सांगण्यात आले आहे. प्रवाशांनी आयआरसीटीसी टुरिझम डॉट कॉम या संकेतस्थळावर आरक्षण व अधिक माहितीसाठी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.