Breaking News

सिंहगड रोड पोलिसांकडून शस्त्रसाठा जप्त

पुणे, दि. 03, ऑक्टोबर - पुण्यातील वडगाव बुद्रुक भागातील प्रयोजा सिटीत सिंहगड पोलिसांनी मोठा शस्त्रसाठा जप्त केला. तसेच एका व्यक्तीला या प्रकरणी  ताब्यात घेतले. धोंडिबा विठ्ठल ढेबे (वय-25,रा. कुसारपेठ ता. वेल्हा, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. सणासुदीच्या काळात ही कारवाई  केल्याचे पोलिसांचे कौतूक होत आहे.
सिंहगड रोड पोलिसांनी माहितीनुसार, पोलिस कर्मचारी दयानंद तेलंगे पाटील आणि दत्ता सोनवणे हे सिंहगड तपास पथकातील कर्मचारी गस्ती असताना त्यांना  वडगाव बु. येथील प्रयोजा सिटीत एक व्यक्ती शस्त्र विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. सदर माहिती मिळताच सिंहगड रोड पोलिसांनी गुरुवारी दुपारी  प्रयोजा सिटी परिसरात सापळा रचला. त्यानंतर चारच्या सुमारास संबंधित व्यक्ती एका ठिकाणी फिरताना दिसला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची झडती  घेतली असता त्याच्याकडे 7.65 चच् बनावटीचा 1 गावठी पिस्तूल, 1 देशी कट्टा तसेच तीन जीवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली. यानंतर पोलिसांनी त्याला  अटक केली. आरोपीविरोधात आर्म अ‍ॅक्ट कलमाखाली गुन्हा दाखल झाला आहे.आरोपी धोंडीबा ढेबे हा मूळचा वेल्हा तालुक्यातील असून, मुंबई येथे हमालीचे काम  करतो. त्याने हत्यारे कुठून आणली, कोणी दिली व कोणाला देणार होता याचा तपास पोलिस करत आहेत.सदरची कामगिरी पोलिस उपायुक्त प्रविण मुंडे, शिवाजी  पवार, विष्णू जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गिरीश सोनवणे, दयानंद तेलंगे पाटील, दत्ता सोनवणे, यशवंत ओंबासे, संतोष सावंत, सचिन  माळवे, सुदाम वावरे, राहुल शेडगे, वामन जाधव, श्रीकांत दगडे, पुरुषोत्तम गुन्ला आदींच्या पथकाने कारवाई केली.