Breaking News

परदेशात फराळ पाठविण्यासाठी टपाल कार्यालयाबाहेर गर्दी

पुणे, दि. 04, ऑक्टोबर -टपाल विभागाच्यावतीने पुण्यातून परदेशात दिवाळी फराळ पाठविण्यास सुरुवात झाली आहे. फराळ पाठविण्यासाठी नागरिकांची गर्दी होऊ  लागली आहे. विशेषतः अमेरिका, जर्मनी, रशिया, इंग्लड आणि फ्रान्स या देशात पुण्यातून फराळ जात आहे.
पुणे शहर आणि जिल्ह्यातील बहुतांशी नागरिक मागील अनेक वर्षापासून नोकरी आणि व्यवसायानिमित्त परदेशात स्थानिक झाले आहेत. कित्येक वेळा त्यांना  दिवाळीच्या सणानिमित्त शहरात येता येईलच याची कोणतीही शाश्‍वती नसते. यामुळे त्यांना दिवाळीच्या सणावेळी गोडधोड परदेशात मिळत नाही. ही बाब लक्षात घेऊन  टपाल विभागाने मागील काही वर्षापासून परदेशात फराळाचे पार्सल पाठविण्याची सोय नागरिकांना उपलब्ध करून दिली आहे. दिवाळीचे औचित्य साधून ज्या  नागरिकांचे नातेवाईक तसेच पाहुणे परदेशात आहेत त्यांना फरळाचे पार्सल पाठविणे यामुळे सोयीचे झाले आहे.
यापूर्वी नागरिकांना फराळाचे पार्सल परदेशात पाठविण्यासाठी अतिशय खटाटोप करावा लागत होता. फराळाचे व्यवस्थित पॅकिग स्वतःलाच करावे लागत होते. तसेच  किती किलो फराळ आहे याचे कोणतेही मोजमाप करता येत नव्हते. आता मात्र मागील तीन वर्षांपासून टपाल कार्यालयच्या जीपीओ येथील कार्यालयात असलेल्या  पार्सल विभागात नागरिकांनी फराळ आणून दिल्यास पार्सल तयार करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यामुळे परदेशात फराळ पाठविण्याचे काम  अतिशय सोपे झाले आहे. पार्सल विभागातील कर्मचारी तत्परतेने फराळ किती किलोचा आहे. याची माहिती लागलीच देतात तसेच काही मिनिटातच पार्सल तयार होत  आहे. त्यामुळे नागरिकांचे काम सोपे झाले आहे.