Breaking News

डॉ. कलाम यांचे जीवन म्हणजे चैतन्याचा झरा - व्यंकटेश परळीकर

पुणे, दि, 12, ऑक्टोबर - नम्रतापूर्वक बोलणे, कनिष्ठांनाही आदराची वागणूक देणे, सतत कामासाठी प्रेरित करणे आणि चुका करून त्या सुधारण्यास प्रवृत्त करणे यासह अनेक पैलूंनी  घडलेले डॉ. कलाम यांचे जीवन आहे. विद्यार्थीप्रिय असलेल्या डॉ. कलामांना विद्यार्थ्यांनी संवाद साधण्यात अधिक जिव्हाळा होता. कार्यमग्नता हेच त्यांचे जीवन होते. इतरांसाठी डॉ. अब्दुल  कलाम यांचे जीवन म्हणजे चैतन्याचा अखंड झरा आहे, असे प्रतिपादन डीआरडीओ संस्थेतील शास्त्रज्ञ व आर. अँड डीईचे संचालक व्यंकटेश परळीकर यांनी केले.
साहित्यवेध प्रतिष्ठान आणि कोहिनूर ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती व वाचन प्रेरणा दिनानिमित्त आयोजित ’कलाम पर्व’ या फोटोबायोग्राफी  प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ. परळीकर यांच्या हस्ते झाले. यावेळी अध्यक्षस्थानी इस्रोचे माजी समूह संचालक डॉ. सुरेश नाईक होते. याप्रसंगी कोहिनूर ग्रुपचे अध्यक्ष कृष्णकांत गोयल, एमआयटी  विश्‍वशांती विद्यापीठाचे अधिष्ठाता प्रा. डॉ. रामचंद्र पुजेरी, भाषा वैज्ञानिक अशोक सोलनकर, पुणे फेस्टिव्हलचे मुख्य संयोजक कृष्णकांत कुदळे, संयोजक कैलास भिंगारे आदी उपस्थित होते.
डॉ. सुरेश नाईक म्हणाले, छायाचित्रांच्या माध्यमातून डॉ. कलाम यांचे जीवन उलगडण्याचा हा स्तुत्य उपक्रम आहे. त्यांच्यासोबत काम करताना जीवनातील अनेक अमूल्य गोष्टी शिकता  आल्या. त्यांच्यातील विन्रमता प्रत्येकाला मोहिनी घालत होती. महासत्ता बनविण्याचे स्वप्न साकार करताना त्यांचे बहुआयामी व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळते. वैज्ञानिक-राष्ट्रपती  म्हणून त्यांची कारकीर्द आपल्या सर्वांसाठी आदर्शवत अशीच आहे. त्यांच्या विचारांतून उद्याच्या उज्ज्वल भारताचे नागरिक घडायला हवेत.
कृष्णकुमार गोयल म्हणाले, साहित्यवेध प्रतिष्ठानने अशा प्रकारचे प्रेरणादायी उपक्रम कायमच राबविले आहेत. त्यांच्या या उपक्रमांना पाठिंबा देऊन डॉ. कलाम यांचा जीवनपट उलगडण्याचा  प्रयत्न करीत आहेत.