Breaking News

विद्यार्थ्यांनी वाचनावर लक्ष केंद्रित करावे - कुलगुरु प्रा. ई. वायुनंदन

नाशिक, १० ऑक्टोबर - अध्यापन आणि संशोधन या विद्यापीठाच्या महत्त्वाच्या बाबी असून यात ग्रंथालयाची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. ग्रंथालयातील ग्रंथसंपदा हीच त्याची समृद्धी असते. माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात कितीही प्रगती झाली तरी वाचन आणि संशोधनाशिवाय अपूर्ण आहे. म्हणून विद्यार्थ्यांनी वाचनावर लक्ष केंद्रित करून संशोधन गुणवत्ता वाढीवर भर द्यावा असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. ई. वायुनंदन यांनी केले.
भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे प्रगत भारताचे स्वप्न साकारण्यासाठी त्यांचा जन्मदिन आज वाचन प्रेरणा दिन म्हणून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त विद्यापीठाच्या ग्रंथालय व माहितीस्रोत केंद्रात आयोजित वाचन प्रेरणा सप्ताहाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे, मानव्यविद्या व सामाजिकशास्रे विद्याशाखेचे संचालक डॉ. उमेश राजदेरकर आणि ग्रंथालय व माहितीस्रोत केंद्राचे प्रमुख डॉ. मधुकर शेवाळे होते.
कुलगुरु प्रा. ई. वायुनंदन पुढे म्हणाले, ज्ञानाची नवीन निर्मिती करण्यासाठी वाचन अत्यंत आवश्यक आहे. ज्ञानामुळेच राष्ट्राची प्रगती होते. ज्ञानातूनच समाजाची निर्मिती होते. वाद, प्रतिवाद आणि वाचन असल्याशिवाय ज्ञानाची निर्मिती शक्य नाही. बदलत्या काळात निरनिराळ्या क्षेत्रात संशोधन होणे गरजेचे आहे. मात्र हे करताना, त्यात नाविन्यता असणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना वाचनाचा छंद लागावा, यासाठी विविध कार्यक्रम राबविण्याच्या सूचना राज्य कुलगुरूंनी यावेळी केल्या. देशातील प्रत्येक व्यक्ती सकारात्मक विचार करून स्वत:ला समृद्ध कसा करेल आणि त्यायोगे देश कसा शक्तिशाली होईल,असाच विचार माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम, प्रणव मुखर्जी यांसारखे दिग्गज नेहमी करीत होते. त्यांच्या कामाची प्रेरणा प्रत्येकाने घ्यायला पाहिजे असेही कुलगुरू वायुनंदन यांनी यांनी सांगितले. मानवी जीवनात प्रगल्भता आणण्यासाठी वाचन महत्त्वाचे असून यासाठी ग्रंथालये उपयुक्त साधन आहे असेही ते म्हणाले.
प्रारंभी कुलगुरु प्रा. ई. वायुनंदन यांनी डॉ. कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी ग्रंथालयात पुस्तक प्रदर्शनही भरविण्यात आले होते. डॉ. मधुकर शेवाळे यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन करून शेवटी उपस्थितांचे आभार मानले. विशेष म्हणजे वाचन प्रेरणा सप्ताहाचे उदघाटन करण्याचा बहुमान कुलगुरूंनी बीबीएची विद्यार्थिनी आफरीन अली हिला दिला.यावेळी सहायक ग्रंथपाल प्रकाश बर्वे यांच्यासह विद्यापीठातील अधिकारी, शिक्षक, विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.