Breaking News

समृध्दी महामार्गासाठी जमीन संपादन प्रक्रिया डिसेंबर अखेर पूर्ण करणार

औरंगाबाद, दि. 09, ऑक्टोबर - नागपूर- मुंबई समृध्दी महामार्ग हा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. या महामार्गासाठी आवश्यक असणार्‍या जमिनीची संपादन प्रक्रिया  डिसेंबर अखेर पूर्ण करणार असल्याचे राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी सांगितले. 
औंरगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात नागपूर- मुंबई समृध्दी महामार्गाबाबत आयोजित आढावा बैठकीत भूषण गगराणी बोलत होते. यावेळी औरंगाबादचे जिल्हाधिकारी  नवल किशोर राम, जालन्याचे जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल तसेच संबंधित विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित  होते.
पुढे बोलतांना भूषण गगराणी म्हणाले की, या महामार्गामुळे अनेकांना रोजगाराची संधी मिळणार आहे. या प्रकल्पामध्ये गुंतवणूक करण्यासाठी जगातील अनेक देश  तयार असून राज्यात मोठी दळणवळण क्रांती घडविणारा हा प्रकल्प आहे. सध्या सह हिस्सेदारांच्या संमती बाबत अडचणी निर्माण झालेल्या आहेत. अशा सह  हिस्सेदारांना नोटीसा देण्यात येणार आहे. ज्यांची जमिनी प्रकल्पात जाणार आहे आणि ज्यांनी संमती दर्शवली आहे त्यांची रजिस्ट्री करण्यात येणार असल्याचे सांगूण  गगराणी पुढे म्हणाले की हंगामी बागायती जमिन कोणती याबाबत शासनाने मार्गदर्शक तत्वे जाहिर केलेले असून हे काम अत्यंत काळजीपूर्वक करण्यासाठी मागणी  असल्यास उपविभागीय अधिकारी किंवा तहसिलदार जाऊन पाहणी करतील आणि अहवाल सादर करतील. औरंगाबाद जिल्यातील 1131 शेतकर्‍यांनी प्रकल्पासाठी  संमती दिली असून 70 जणांच्या रजिस्ट्री झालेल्या आहेत. तर जालना जिल्ह्यातील 589 शेतकर्‍यांनी संमती दर्शविली असून 19 जणांच्या रजिस्ट्री झाल्या  असल्याचेही गगराणी यांनी यावेळी सांगितले.