Breaking News

केंद्र आणि राज्यातील भाजपचे सरकार सर्वसामान्यांचे नव्हे !

पुणे, दि. 08, ऑक्टोबर - ‘एकही भूल कमल का फुल’,अच्छे दिन आने वाले है, मोदीजी जाने वाले है’, ‘भाजप सरकार मजेत मस्त, सामान्य जनता त्रस्तच  त्रस्त’, ‘जनता उपाशी सरकार तुपाशी’, ‘भाजप सरकार नव्हे ब्लू व्हेल गेमच’, ‘शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफी मिळालीच पाहिजे’, हेच का मोदी सरकारचे अच्छे  दिन?’ आदी घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोर्चात ऐकू आल्या. इंधन दरवाढ, भारनियमन, शेतकरी आत्महत्या, गॅस दरवाढ, सोलापुरातील मिनी आणि मेजर  गाळेधारकांना रेडीरेकनर दराप्रमाणे भाडे आकारणी करावी, सध्याचे गाळे त्यांना कायमस्वरूपी विकत देण्यासंदर्भात शासनाने निर्णय घ्यावा, स्मार्ट सिटीच्या  नावाखाली सोलापूरकरांची सुरु असलेली फसवणूक, आरोग्य सेवेचा उडालेला बोजवारा आदी मुद्द्यांवर भाजप आणि केंद्र, राज्य महापालिकेतील सत्ताधार्‍यांना  घेरण्यात आले. भाजप सरकारची पोलखोल करणारी फलके हाती धरलेले कार्यकर्ते ‘भाजप सरकारचा धिक्कार असो’ अशा घोषणा देत होते.
राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव आणि कार्याध्यक्ष संतोष पवार यांच्या नेतृत्वाखाली सकाळी अकरा वाजता चार हुतात्मा पुतळा परिसरातून मोर्चा निघाला. तो  जिल्हाधिकारी कार्यालयावर आल्यानंतर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. प्रभारी निवासी जिल्हाधिकारी रेश्मा माळी यांना शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदन दिले. तत्पूर्वी  झालेल्या भाषणात जाधव, पवार, माजी महापौर मनोहर सपाटे, दिलीप कोल्हे, राजन जाधव, दिनेश शिंदे, अशोक मुळीक, निर्मला बावीकर आदींनी टीका करत  भाजप सरकारने अच्छे दिनचे स्वप्न दाखवून जनतेची फसवणूक केल्याचा आरोप केला. भाजप सरकार गरिबांचे सरकार नसून ते धनदांडग्यांचे सरकार आहेत.  घोषणाबाज सरकारमुळे अच्छे दिन नव्हे तर बेकार दिन आल्याचा आरोप पवार यांनी केला.