Breaking News

खासदार उदयनराजेंनी केले शरद पवारांच्या गाडीचे सारथ्य, पुणे-सातारा प्रवास एकत्र

पुणे, दि. 05, ऑक्टोबर - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज सातारा जिल्ह्याच्या दौ-यावर आहेत. शरद पवार आज सकाळी आठ वाजता पुण्यातून  साता-याकडे रवाना झाले. मात्र, त्यांच्यासमवेत खासदार उदयनराजे भोसलेही होते. विशेष म्हणजे पवारांच्या गाडीचे सारथ्य खुद्द उदयनराजे हेच करत होते. गेल्या  काही दिवसापासून साता-यातील राष्ट्रवादीतील नेत्यांत आणि उदयनराजेंत वाद सुरु असतानाच्या पार्श्‍वभूमीवर या दोघांचे एकत्र येणे महत्त्वाचे मानले जात आहे.  सोबतच अधून-मधून उदयनराजे राष्ट्रवादी सोडणार व भाजपात जाणार अशा वावड्या उठतात. मात्र, आज पवारांच्या गाडीचे सारथ्य खुद्द उदयनराजेंनी केल्याचे या  चर्चा थांबतील असे बोलले जात आहे.
विजयादशमीचा ’शाही दसरा सोहळा’ सातार्‍यात साजरा केल्यानंतर उदयनराजे मागील तीन-चार दिवसापासून पुण्यातच होते. आज शरद पवारांचा सातारा जिल्हा  दौरा ठरविण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे आणि राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील बहुतांश नेते यांच्यातील वाद प्रचंड उफाळला असतानाच मंगळवारी  दोघांचे मोबाईलवर बोलणे झाले होते. यावर उदयनराजेंनी मी पुण्यात असून, उद्या सकाळी सोबतच साता-याला जावू असे पवारांना सांगितले. त्यानुसार कालची  मुंबईतील बैठक आटोपून पवार काल रात्री पुण्यात दाखल झाले होते. त्यानंतर आज सकाळी ते एकत्र भेटले.
’चर्चा करतच सातार्‍याला जाऊ,’ असे ठरल्यानंतर शरद पवारांनी उदयनराजेंना आपल्या गाडीत बोलाविले. उदयनराजे पवारांच्या गाडीत बसले खरे परंतु त्यांनी  आपल्या नेहमीच्या स्टाईलने थेट गाडीची चावीच आपल्या हातात घेतली. ड्रायव्हिंग सीटवर राजे बसले तर शेजारी शरद पवार. पुण्याहून साता-याला येताना या  दोघांमध्ये दोन तास राजकीय चर्चा झाली. आता पवार सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीचा वाद मिटवणार का याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष असेल.
सकाळी 10. 15 वाजता आनेवाडी टोल नाका येथे व सर्किट हाउस येथे त्यांची गाडी आली. यावेळी त्यांच्या गाडीत उदयनराजेही होते. सातार्‍याच्या शासकीय  विश्रामगृहात ही गाडी आल्यानंतर उपस्थितांना प्रचंड धक्का बसला तर कार्यकर्त्यांचे डोळे विस्फारले. सातरा जिल्ह्यातील नेते रामराजे निंबाळकर असो की, चुलतबंधू  शिवेंद्रराजे असो उदयनराजे सातत्याने पक्षातील नेत्यांनाच आव्हान देत आहेत. या वादात पवारांनी थेट उडी घेतली व मधल्या काळात या प्रकरणाची दुरूनच माहिती  घेत होते. पवारांना रामराजे व उदयनराजे हे दोघेही सारखेच आहेत. दोघांचीही राजकीय ताकद मोठी त्यामुळे कोणा एकालाही सोडले तरी पक्षाचे नुकसान. त्यामुळे  पवारांनी याप्रकरणावर चुप्पी साधली होती. मात्र, पवारांनी ही कोंडी फोडण्याचे ठरवले आहे.
देशातील, राज्यातील वातावरण बदलत आहे. भाजपविरोधात जनमत तयार होत असल्याचे पवारांनी मुंबईतील बैठकीत मत व्यक्त केल्यानंतर पक्षातंर्गत डागडुजी  करण्याकडे त्यांनी लक्ष घातल्याचे मानले जात आहे.