Breaking News

संपादकीय - शाश्‍वत विकासाचे मूल्य!

भारतात वायू प्रदुषणामुळे वर्षात 6 लाख 21 हजार 138 लोकांचा मृत्यू होत असल्याचे नुकतेच एका अहवालावरून सस्पष्ट झाले आहे. भारतात होणार्‍या एकूण मृत्यूंपैकी 75 टक्के मृत्यू वायू प्रदुषणाशी संबंधित असतात. बहुतांश लोकांना श्‍वसनाचे विकार, हृदयरोग, तसेच फुफ्फुसाशी संबंधित आजार या प्रदूषणामुळे होतात. वातावरणातील नेहमीच्या घटकांशिवाय वातावरणात विविध प्रक्रियांनी शिरणारे व मानव, मानवेतर प्राणी, वनस्पती किंवा काही निर्जीव जड वस्तूंवर मोजता येण्याइतका किंवा दृश्य स्वरूपात आढळण्याइतका परिणाम करू शकतील इतपत संहती असणारे इतर पदार्थांचे सूक्ष्म कण म्हणजेच वातावरणीय प्रदूषके असे म्हटले जाते. 

एकीकडे विकासाचा डोलारा सांभाळत असतांना त्याचा मानवी जीवनावर होणारा परिणाम देखील तितकाच गंभीर असल्याचे समोर आले आहे. शाश्‍वत विकासाचे मूल्य आपण किती प्रमाणात जोपासतो, हे देखील महत्वाचे आहे. औद्योगीकरण, कारखानदारी आपण मोठया प्रमाणात वाढवत चाललो आहे, ते केवळ पाश्‍चात्य देशांच्या विकासाच्या संकल्पनेवर. मात्र तिथे सर्वसामान्यांच्या जीवनाचा, आयुमार्नाचा विचार केला जातो. 

उत्कृष्ट मनुष्यबळ असेल तर विकास साधण्यास अडचणी येथ नाही, त्यामुळे पाश्‍चात्य देशात आपल्या नागरिकांचे आरोग्य जपले जाते, त्याची काळजी घेतली जाते. मात्र आपल्याकडे सध्या विकासाचा भस्मासूर सर्वसामान्यांचे जीवन, त्यांचे आरोग्य खिळखिहे करत आहे. त्याला अनेक व्याधी जडत आहे. भारतात हृदयरोगामुळे 2 लाख 49 हजार 388 जणांचे मृत्यू होतात. 

जगभरात प्रत्येक 10 पैकी 9 जण घातक हवेचे श्‍वसन करत आहेत. वायू प्रदुषणामुळे होणारे 90 टक्के मृत्यू हे मध्य आणि अल्प उत्पन्न गटातील देशांमध्ये आहेत. हे अत्यंत धक्कादायक वासत्व आहे. देशातील विविध राज्यात विकासप्रक्रिया राबवतांना सर्वांगिण विचार केला जात नाही. केवळ उत्पन्न या एकाच बाबीवर लक्ष केंद्रित केले जाते, परिणामी त्याचा मानवी जीवनावर अत्यंत घातक असे परिणाम होतात.

वातावरणीय प्रदूषणाचे हवामानावरही निरनिराळ्या प्रकारचे परिणाम होतात. औद्योगिक धुरामुळे दृश्यमानता मंदावते. पृथ्वीला सूर्यापासून मिळणार्या प्रारणात घट होते. सुक्ष्म धुक्यांची संख्या व धुक्यांचा कालावधी वाढतो. वातावरणीय प्रदूषकांत आर्द्रता शोषून घेणारे व त्यामुळे जलबाष्पाचे द्रवरूपात अवस्थांतर करणारे कण अधिक संख्येने असल्यास औद्योगिक परिसरातील पर्जन्यात वाढ होऊ शकते.

व भ्रमण करणार्या प्रदूषकांमुळे मानवी जीवन, प्राण्यांच्या चारा व दाणावैरण यावर गंभीर परिणाम होवून ते दूषित होतात. काही औद्योगिक कारख्यान्यांतून निघणारी फ्ल्युओराइडे व आर्सेनिकाची संयुगे लगतच्या परिसरात राहणार्या जनावरांच्या विनाशास कारणीभूत झाली आहेत. हवेतील प्रदूषकांमुळे वनस्पतींचा विकास खुंटतो. वातवरणीय प्रदूषणामुळे अनेक दुर्घटना उद्भवल्या आहेत व त्यांमुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली आहे.

पोलादाचे कारखाने, काचकामाचे कारखाने, ऊर्जानिर्मिती केंद्रे, चुन्याच्या भट्ट्या, सल्फ्यूरिक अम्ल तयार करणारा, रासायनिक खते बनविणारा कारखाना, कोळशापासून कोक तयार करणारे कारखाने, जस्त शुद्ध करणारे कारखाने असे विविध प्रकारचे प्रकल्प उभारत असतांना, त्याचे मानवी जीवनावर काय गंभीर परिणाम होतात, ते पर्यावरणपूरक आहेत का? याचा देखील विचार करण्याची वेळ आली आहे.

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी दैनिक लोकमंथन चे फेसबुक पेज लाईक आणि ट्विटर वर फॉलो करा