Breaking News

दखल - कोरेगाव भीमा दंगलीमागं हिंदुत्ववादीच !कोरेगाव भीमाच्या दंगलीमागं हिंदुत्त्ववादी संघटनांचाच हात असल्याचं अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर सातत्यानं सांगत आहेत. त्याच्याअगोदर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही हाच आरोप केला होता. रामदास आठवले मात्र ते मान्य करायला तयार नव्हते. मराठा समाजावर खापर फोडून ते रिकामे होत होते. या दंगलीत एकाचा मृत्यू झाला. कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. दोष नसताना अनेक कुटुंबांना रस्त्यावर यावं लागलं. देशभर दंगलीचं लोण पसरलं. संसदेत चर्चा झाली. पवार व आंबेडकर यांच्यावर शिवराळ भाषेत टीका करण्यापर्यंत काहींची मजल गेली. स्थानिकांनी एकत्र येऊन नंतर कोरेगाव भीमा, वढू, सणसवाडी परिसरात सामंजस्य निर्माण केले. परस्परांवरचे गुन्हे मागं घेतले. त्यानंतर काहींना अटक झाली; परंतु दंगल घडविण्यामागं ज्यांचा मेंदू होता, त्यांच्यापर्यंत अजूनही पोलिस यंत्रणा पोचलेली नाही. 

अ‍ॅड. आंबेडकर यांनी मिलिंद एकबोटे व संभाजी भिडे गुरूजी यांची नावं घेतली. भिडे गुरूजी यांनी नंतर महाराष्ट्रातील 288 आमदारांची अक्कल काढली, तरी सरकारला त्यांच्याविरोधात कारवाई करावी, असं वाटलेलं नाही. उलट, मिलिंद एकबोटे यांच्या समर्थनार्थ अनेक दलित संघटना पुढं आल्या. त्यांच्या जामिनाचं प्रकरण अजून न्यायप्रविष्ठ आहे. त्यावर सुनावणीही झालेली नाही. पुरोगामी महाराष्ट्राची मान शरमेनं खाली घालायला लावलेल्या या दंगलीचा सत्यशोधन अहवाल आता हाती आला आहे. 

कोरेगाव भीमा दंगल हा पूर्वनियोजित कट असल्याचा दावा सत्यशोधन समितीनं केला आहे. त्यात संभाजी भिडे तसेच मिलिंद एकबोटे यांचा हात असल्याचंही सत्यशोधन समितीनं म्हटलं आहे. कोरेगाव भीमामध्ये स्तंभाला अभिवादन करण्यासाठी आलेल्या दलितांवर आधी हल्ला करण्यात आला, यानंतर दंगल उसळल्याचं सत्यशोधन समितीच्या अहवालात म्हटलं आहे. एक जानेवारी 2018 रोजी जेव्हा कोरेगाव भीमात दंगल उसळली, तेव्हा कोल्हापूर परिक्षेत्राचे महानिरीक्षक विश्‍वास नांगरे पाटील यांनी दंगलीच्या चौकशीसाठी दहा 10 दलितांची सत्यशोधन समिती नेमली होती, त्या समितीनं हा अहवाल दिला आहे. हा सुनियोजित कट असल्याचं सांगत, 30 डिसेंबर 2017 रोजी परिसरातील सोनई हॉटेलमध्ये मिलिंद एकबोटे यांनी बैठक घेतल्याचं समितीनं या अहवालात म्हटलं आहे. तसंच संभाजी भिडे यांचं त्या ठिकाणी येणं जाणं होतं, तसेच आपण हे सारे पुरावे सादर करू असं सत्यशोधन समितीनं म्हटलं आहे.

एक जानेवारी 1818 रोजी कोरेगाव भीमाच्या लढाईत आठशे दलितांनी इंग्रजांकडून लढत, बाजीराव पेशव्यांच्या 27 हजार सैनिकांना हरवलं होतं. या घटनेला एक जानेवारीला 200 वर्ष पूर्ण झाली. यासाठी कोरेगाव भीमाजवळ उभारलेल्या स्तंभाला तसंच सैनिकांना अभिवादन करण्यासाठी एक जानेवारी 2018 रोजी दलित बांधव जमले होते. त्यांच्यावर सुरूवातीला हल्ला करण्यात आला, यानंतर दंगल उसळली असं अहवालात म्हटलं आहे. यानंतर राज्यभरात दुसर्‍या दिवशी दलित संघटनांनी कडकडीत बंद पाळला, तसंच अनेक ठिकाणी निषेध व्यक्त केला. तिसर्‍या दिवशीही अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या इशार्‍यानुसार बंद पाळण्यात आला. दंगलीला शनिवार वाड्यावर घडलेली एल्गार परिषद जबाबदार आहे. 

या परिषदेला उपस्थित असलेल्या जिग्नेश मेवाणी, उमर खलीद यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. या दंगलीमागं नक्षलवाद्यांचा हात असल्याचा आरोप करण्यात आला. पोलिसांच्या गुप्तचर विभागानंही तसा अहवाल दिला होता; परंतु आता सत्यशोधन समितीनं मात्र भिडे व एकबोटे यांच्यावरच ठपका ठेवला आहे. कल्याणमध्ये संशयावरून अटक केलेल्या सात नक्षलवाद्यांचा कोरेगाव भीमाच्या दंगलीशी संबंध जोडण्याची घाई करण्यात आली. त्यानंतर त्यातही काहीच तथ्य आढळलं नाही. अर्थात सत्यशोधन समितीचा अहवाल किती विश्‍वासार्ह मानायचा, हा खरा प्रश्‍न आहे. त्याचं कारण जवखेडेखालसा प्रकरणात सत्यशोधन समितीचा अहवाल आणि वस्तुस्थिती वेगळीच होती.