Breaking News

दखल - बरं झालं मोनिकाताई सावरल्या

पती निधनाचं दु:ख मोठं असतंच; परंतु त्यातूनही सावरावं लागतं. विशेषत: राजकारणातील व्यक्तींना तर आपलं दु:ख खुटींला टांगून इतरांसाठी उभं राहावं लागतं. हे म्हणणं सोपं नसेलही; परंतु त्याशिवाय अन्य पर्यायही नसतो. आजोबा आमदार, वडील माजी मंत्री, सासरे आमदार, पती आमदार, पतीचे मामा मंत्री आदी सर्व गोतावळा राजकारणी असल्यानं अशा व्यक्तिगत दु:खाची कधी सवय नव्हती. त्यातही बहुतांश नातेवाइकांना सुदैवानं चांगलं दीर्घायुरारोग्य लाभल्यानं कुटुंबावर असं काही संकट अचानक कोसळेल, याची मोनिकाताईर्नी कल्पनाही केली नसेल. पती राजीव राजळे यांना किती वर्षे आमदारकी मिळाली, यापेक्षा त्यांनी आमदारकीचा उपयोग कसा केला, हे जास्त महत्वाचं. पहिल्यांदा निवडून येऊनही त्यांनी विरोधी पक्षाचा आमदार म्हणून विधानसभेत अर्थसंकल्पावर केलेलं भाषण चांगलंच गाजलं होतं. नगरमधील जनता राजीव राजळे यांना कायम आदरानं राजाभाऊच म्हणायची. या माणसानं आयुष्यात काय कमावलं असेल, तर ती माणसं. संगीत, पुस्तकं, क्रीडा अशा विविध क्षेत्रांत राजाभाऊंचा लीलया संचार असे. खासदार, आमदार होण्यासाठी त्यांनी नंतरच्या काळात भरपूर संघर्ष केला; परंतु नंतर त्यांना यश हुलकावणी देत गेलं. राजकारणात दिलेला शब्द पाळायचा असतो, असं मानणार्‍या राजाभाऊंना त्यांच्या राजकीय आयुष्यात मात्र शब्द न पाळणारेच जास्त भेटले. त्याचा त्यांना विषाद होता. माजी खासदार यशवंतराव गडाख यांनी त्यांचा उल्लेख केला होता; परंतु त्या काळात गडाख हे राजकारणातील बडे प्रस्थ असताना आपल्या सुनेच्या भावावर होत असलेला राजकीय अन्याय त्यांना दूर करता आला नव्हता. राजीव यांचं हे आतून जळणं आणि झुरणं मोनिकाताई पाहत होत्या. राजकीय कुटुंबातून आलेल्या मोनिकाताईंना अपेक्षाभंगाचं दु:ख माहीत नव्हतं, असं नाही; परंतु राजाभाऊंच्या स्वच्छंदी मनाला त्याच काय कुणीही आळा घालू शकणार नव्हतं.


राजाभाऊंचं वय तसं फारच कमी. त्यांच्या अशा अचानक जाण्यानं मोनिकाताईंचं दु:ख किती मोठं असेल, याची कल्पना करता येऊ शकते. सात-आठ महिन्यांपूर्वीचं मोनिकाताईंचं एखाद्या कार्यक्रमातील वावरणं गेल्या दोन दिवसांपूर्वीचं वावरणं पाहिलं, तर त्या किती खचल्या आहेत, हे लक्षात येतं. त्या पाथर्डी-शेवगावच्या आमदार. त्यांचा मतदारसंघ बीड जिल्ह्याला लागून असलेला. गोपीनाथ मुंडे यांनी पाथर्डीला मावशी मानलेलं. त्यांनी या मतदारसंघातील लोकांना, नेत्यांना कायम ताकद दिली. त्यांचं पाथर्डीवर भरपूर प्रेम. त्यांच्या परळी मतदारसंघाइतकाच त्यांचा पाथर्डी-शेवगाववर लोभ. अशा मतदारसंघातील भाजपच्याच आमदार असलेल्या मोनिकाताईंनी घरात बसून राहणं भाजपच्या कार्यकर्त्यांनाही तितकचं नाउमेद करणारं होतं. त्यांच्यापेक्षा मोनिकाताईर्ंचं दु:ख मोठं होतं. मोठमोठी स्वप्नं प्रत्यक्षात येण्याची शक्यता दिसत असताना पतीनं असं अर्ध्यावरती डाव सोडून जाणं मोठा आघात करणारंच असतं. त्यात काहीच शंका नाही. एखाद्या कुटुंबाच्या प्रमुखांचं निधन होणं आणि लाखोंच्या पोशिंद्यांचं निधन होणं, यातही फरक असतो. राजीवनं तर या जगाचा निरोप घेतला; परंतु त्यांना त्यांच्या आयुष्यात जे करता आलं नाही, ते मोनिकाताईंच्या हातून व्हावं, अशी त्यांची नक्कीच अपेक्षा असणार. त्याशिवाय का त्यांनी मोनिकाताईंना जिल्हा परिषदेच्या आणि नंतर विधानसभेच्या निवडणुकीत उतरवून निवडून आणलं. आता राजाभाऊंच्या निधनानं निर्माण झालेली पोकळी भरून काढण्याची जबाबदारी मोनिकाताईंची आहे. वृद्ध सासरे आप्पासाहेब यांना धीर देण्याचंं कामही त्यांनाच करायचं आहे. अशा काळात त्यांनी हातपाय गाळले, तर आप्पासाहेब, तालुक्यातील जनता आणि मुख्य म्हणजे दोन लहानग्यांना कोण धीर देणार? कधीतरी काळजावर दगड ठेवून, लोकनिंदेची पर्वा न करता जीवनाचा रथ पुढं नेण्यासाठी खंबीर व्हावं लागतं. याचा अर्थ मोनिकाताईंच्या राजीवच्या आठवणींचा विसर पडलेला आहे, असा नाही. राजाभाऊंच्या आठवणी बरोबर घेऊनच त्यांना जीवनाची ही नौका पार करायची आहे. त्यांचं दु:ख निसंशय मोठं आहे; परंतु लोकांच्या सुखासाठी आपलं दु:ख, आवंढे बाजूला ठेवावे लागतात.

राजीव राजळे यांच्या निधनानंतर मोनिकाताई मानसिक धक्क्यातून सावरल्या नव्हत्या. पाथर्डी, शेवगाव तालुक्यांतील कार्यकर्ते विविध मार्गांनी प्रयत्न करीत होते. त्यांनी राजकारणात सक्रीय झाले, तर कामात त्यांचा वेळ जाईल. त्यामुळं त्यांना तेवढा काळ दु:ख बाजूला ठेवता येईल, असं त्यांच्या कार्यकर्त्यांना वाटणं स्वाभावीक आहे. मोनिकाताईंना सक्रीय करण्याचा, विविध उपक्रम राबवून त्यांना मानसिक बळ देण्याचा कार्यकर्त्यांनी प्रयत्न केला; परंतु त्यात त्यांना अपयश येत होते. अखेर प्रमुख कार्यकर्त्यांनी परळी येथे राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे-पालवे यांची भेट घेतली. पाथर्डीला येऊन आमदार मोनिकाताईंना सक्रिय करा, असा आग्रह या कार्यकर्त्यांनी धरला. खरं तर नगर जिल्ह्यात मोनिकाताईंचे निकटचे नातेवाइक वेगवेगळ्या पक्षांत कार्यरत आहेत. त्यांनी वडीलकीच्या नात्यानं सबुरीनं, प्रसंगी कठोर होऊन मोनिकाताईंना या दु:खातून बाहेर यायला भाग पाडायला हवं होतं. भाजपचा एक खासदार, एक मंत्री आणि आणखी तीन आमदार असतानाही आपल्या सहकार्‍याला दु:खाच्या छायेतून बाहेर काढण्याला प्राधान्य द्यायला हवं होतं. एक तर महिला आमदार आहेत. त्यांना महिला म्हणून मोनिकाताईंना मनमोकळं करायला लावून त्यांची अशा मानसिक अवस्थेतून सुटका करायला लावणं शक्य झालं असतं. अखेर राजळे-मुंडे कुटुंबाचे घनिष्ठ संबंधच इथं उपयोगी आले. पंकजा यांनी नगरच्या दौर्‍यात पाथर्डीचा समावेश केला. सुमारे दीड तास त्यांनी वेळ दिला. पंकजा यांनी मोनिकाताईंचं सांत्वन करत त्यांच्यासोबत भोजन केलं. मोनिका तू स्वतःला सावर, आपण लाखोंचे पोशिंदे आहोत. डोळ्यांच्या आत दुःख लपवायचं. राजीव यांना कामातून जिवंत ठेवायचं. मी बहीण तर आहेच; परंतु यापुढं मैत्रीण म्हणून बरोबर राहीन. मी तुला सार्वजनिक जीवनात सक्रीय करण्यासाठी आले आहे. अर्ध्या रात्री दार ठोठव. मी तुझ्यामागं खंबीरपणे उभी आहे. रडायचं नाही, लढायचं अशा शब्दांत पंकजा यांनी मोनिकाताईंना धीर दिला. कार्यकर्त्यांशी संवाद साधत त्यांनी मोनिकाताईंना व्यासपीठावर आणलं. संपूर्ण कार्यक्रम होईपर्यंत मोनिकाताईंना अश्रू आवरणं शक्य झालं नाही.

पंकजाताईंनी दोन दु:खं पचवली आहेत. काळ हा दु:खावर इलाज असतो; परंतु त्याअगोदर आपणच आपलं मन घट्ट करायचं असतं. धीरानं उभं राहायचं असतं. मामा प्रमोद महाजन व वडील गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाच्या धक्क्यातून केवळ पंकजा सावरल्या नाहीत, तर पूनम महाजन यांनाही सावरलं. प्रत्येकाच्या आयुष्यात भावनिक पोकळी निर्माण होते; परंतु ही पोकळी भरून काढण्याचं काम करावं लागतं. प्रमोद महाजन यांच्या खूनानंतर पूनम महाजन, गोपीनाथ मुंडे यांना आपण कसं सावरलं, हे सांगून पंकजाताईंनी मोनिकाताईंना सावरण्याचा कानमंत्र दिला. राजीव राजळे यांचं काम अत्यंत नेटकं असायचं; पण स्वतः ते कधी पुढे आले नाहीत. स्वतःचे दुःख बाजूला ठेवून इतरांचं दुःख सहन करण्याची स्त्रीला ईश्‍वराने अपार शक्ती दिली आहे. स्वतःला सावरा. मुंडे यांनी पाथर्डीवर अपार प्रेम केलं. तोच आदर्श ठेवत आपण अंतर देणार नाही, असा शब्द पंकजा यांनी मोनिकाताईंना दिला. परळी एवढीच कामं पाथर्डी-शेवगाव मतदारसंघात करू. मतं देऊन लोकांनी विश्‍वास दाखवला. त्याला पात्र राहण्यासाठी दुःख बाजूला ठेवावं. जिजाऊंनी सोळा वर्षांच्या शिवबाला बाहेर पाठवलं नसतं, तर स्वराज्य निर्माण झालं नसतं. अहिल्याबार्ईंनी सर्व कुटुंबाचं दुःख उरात ठेवलं असतं, तर जुलमी राजवटीला आवर बसला नसता. राजीव यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी काळजावर दगड ठेवून बाहेर पडा. आपण मुळातच सक्षम आहात, तरीही भावनिक नाजुकता पाहता काही काळासाठी आपली संपूर्ण जबाबदारी मी घेते. राजीव यांना डोळ्यासमोर ठेवून मार्गक्रमण करा. गरजूंची कामं करून त्यांचे आशीर्वाद घ्या, अशा शब्दांत त्यांना जगण्यासाठी नवी उभारी दिली. आता मोनिकाताईंनी खंबीरपणे उभं राहावं. त्यांनी राजीवजींचं स्वप्न साकारण्यासाठी काम करण्याचा केलेला दृढ निश्‍चय महत्वाचा आहे.