Breaking News

प्रज्ञा वाळकेकृत अपहारातील घडामोडी संशयास्पद


एकाच दिवशी वेगवेगळया दिनांकाच्या आवकपत्रांची शहर इलाखात नोंद
आमदारांच्या पत्रांचा समावेश असल्याने गांभीर्य वाढले 

मुंबई/विशेष प्रतिनिधी : 
शहर इलाखा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बहुचर्चित कार्यकारी अभियंता प्रज्ञा वाळके यांनी मनोरा आमदार निवास इमारत गैरव्यवहार केला या आरोपाशी संबंधित कार्यकारी अभियंत्यांच्या बाजूने दाखल केलेले पुरावे, मुख्य अभियंता, अधिक्षक अभियंता, दक्षता पथकाचे अधिक्षक अभियंता, चौकशी अहवाल, आठ आमदारांनी दिलेले पत्र, विधीमंडळात झालेली चर्चा, आ. चरणभाऊ वाघमारे यांनी मुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री, साबां प्रधान सचिवांशी वेळोवेळी केलेला पत्रव्यवहार या सार्‍या घडामोडींचा संदर्भ पाहिल्यानंतर या प्रकरणात प्रज्ञा वाळके यांचा पाय भ्रष्टाचाराच्या दलदलीत रूतला असल्याचे स्पष्ट होते. तरीही मी नाही भ्रष्ट चौकशी दडपून करा तुष्ट अशी भूमिका साबांत पहायला मिळत आहे.

शहर इलाखा विभागातील प्रज्ञा वाळके कृत मनोरा आमदार निवास इमारत कामाचा अपहार प्रकरणी चौकशी करून दि. 5 आक्टोबर 2017 रोजी मुंबई साबांचे अधिक्षक अभियंता अरविंद सुर्यवंशी यांनी वस्तुनिष्ठ अहवाल साबांचे प्रधान सचिव आशिषकुमार सिंह यांना सादर केला. या अहवालात आ. चरणभाऊ वाघमारे यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने पाहणी केल्यानंतर प्राथमिक चौकशीत प्रथम दर्शनी प्रशासकीय व आर्थिक अनियमितता झाल्याचे निदर्शनास आले असे म्हटले आहे. या आठ पानी अहवालात 31 आमदारांच्या खोल्यांपैकी फक्त दहा खोल्यांचा उल्लेख असून या 10 पैकी 9 आमदारांच्या खोल्यांवर अंदाजपत्रक व निविदेप्रमाणे काम करण्यात आली नाहीत, मात्र देयके अदा करण्यात आली. फक्त आ. बाळासाहेब मुरकुटे यांच्या खोलीवर 10 लाखांपैकी केवळ दोन लाख रूपयांचे काम करण्यात आले असा शेरा अधिक्षक अभियंत्यांनी मारला आहे. या चौकशीत प्रामुख्याने कार्यकारी अभियंता, उपअभियंता, शाखा अभियंता हे प्राथमिक चौकशीत जबाबदार असल्याचे निष्पन्न झाले असून कार्यकारी अभियंता (प्रज्ञा वाळके), उपअभियंता (बी.एस.फेगडे), शाखा अभियंता(के.डी.धोंगडे) प्राथमिक चौकशीत दोषी आढळून आलेले आहेत. असा स्पष्ट उल्लेख अधिक्षक अभियंता अरविंद सुर्यवंशी यांनी साबांचे प्रधान सचिव आशिष कुमार सिंह यांना सादर केलेल्या अहवालात केला आहे. 

अरविंद सुर्यवंशी यांनी आपल्या पातळीवर चौकशी करून या अपहारा संदर्भात वस्तुस्थिती कथन करणारा अहवाल सादर केला. या प्राथमिक चौकशीनंतर साबां दक्षता पथकाचे अधिक्षक अभियंता धनंजय चामलवार या अपहाराची सखोल चौकशी करीत आहेत. धनंजय चामलवार चौकशी करीत असतांना प्रज्ञा वाळके यांनी अरविंद सुर्यवंशी यांचीही दिशाभूल केल्याचे निदर्शनास आले आहे. अरविंद सुर्यवंशी यांनी त्यांना प्रज्ञा वाळके यांच्यांकडून दाखल झालेला दस्तऐवज दक्षता पथकाला सादर केला, यात अनेक त्रुटी असून प्रज्ञा वाळके यांनी केलेला आमदारांच्या मागणीच्या दाव्याशी संबंधित आमदारांचे मागणी पत्र आणि या मागणी पत्राला सक्षम अभियंत्यांची मंजूरी असलेले दस्त मुळ कागदपत्रात अथवा अरविंद सुर्यवंशी यांनी केलेल्या चौकशी दरम्यान प्रज्ञा वाळके यांनी उपलब्ध करून दिलेले नाहीत. ही बाब धनंजय चामलवार यांनी दि.18 डिसेंबर 2017 रोजी दिलेल्या पत्रान्वये निदर्शनास आणल्यानंतर प्रज्ञा वाळके यांच्याकडून आठ आमदारांची वेगवेगळ्या तारीख असलेली पत्रे सादर करण्यात आली. या पत्रातील मजकूर आणि दक्षता पथकाला अपेक्षित असलेला मजकूर यात विसंगती आढळत असल्याने या पत्रांच्या खरेपणावर संशय व्यक्त केला जात आहे. यातील काही पत्रांवर असलेल्या तारखाही संशयास कारणीभूत ठरत आहेत. दक्षता पथकाने दि.18/12/2017 रोजी दिलेल्या पत्रात हा मुद्दा उपस्थित केला, 

त्या आधी दि.5 आक्टोबर 2017 रोजी अरविंद सुर्यवंशी यांनी अहवाल सादर केला. प्रज्ञा वाळके यांचा आमदारांच्या मागणीनुसार वादग्रस्त कक्षात काम केल्याचा दावा खरा आहे असे गृहीत धरले तरी आमदारांनी दिलेल्या पत्रांवर आक्टोबर महिन्याच्या आधीची अथवा हे प्रकरण चव्हाट्यावर येण्यापुर्वीची तारीख असायला हवी, तथापी काही आमदारांच्या पत्रांवर या प्रकरणाची चर्चा सुरू झाल्यानंतर, चौकशी प्रक्रिया सुरू असतांना तर काही पत्रांवर अहवाल सादर झाल्यानंतरची तारिख (दि.20/09/2017-दि.28/09/2017-दि.12/10/2017-दि.3/11/2017) आहे. सर्वात गंभीर बाब म्हणजे ही सर्व पत्रे कार्यकारी अभियंता शहर इलाखा विभाग यांच्या आवक नोंदवहीत एकाच दिवशी (दि.19/12/2017) नोंदविण्यात आली आहेत. सन 2016 ची काही पत्रे देखील याच दिवशी या आवक नोंदवहीत नोंदविण्याचा विश्‍वविक्रमही शहर इलाखा साबां विभागाने करून दाखविला आहे. प्रज्ञा वाळके यांना या अपहारात दोषी ठरवून सजा होण्यासाठी आणखी कुठले पुरावे शासनाला अपेक्षित आहे असा उद्विग्न सवाल प्रज्ञा वाळके यांच्या भ्रष्ट कारभाराचे चटके बसलेले कंत्राटदार आणि साबां अभियंते विचारीत आहेत.