Breaking News

नथ घालून नकटे नाक झाकण्याचा प्रयत्न !

अहमदनगरःचार चौघांसारखा दिसणारा चेहरा गालावर पावडर फासून गल्लीभर हुंदडून सांगतो ,या गावात मीच सर्वात सुंदर, तेव्हा गावकी त्याच्या या बालीशपणावर गालातल्या गालात हसत असते.इकडे फाजील अहांकारात बुडालेल्या त्या स्वस्तुती पाठकाला त्यांची वार्ताही नसते,खरे तर या गावात सर्वाधिक सुंदर कोण याची विचारणा कुणी केलेली नसते तरीही स्वतःला आरती ओवाळून घेण्याची विकृत मानसिकता असलेले स्वतःच तयार केलेल्या स्पर्धा परिक्षांचे परिक्षार्थी ठरवून निकाल लावीत असतात.यातून गावाची करमणूक होण्यापलिकडे फार काही साध्य होते असे नाही.


मीच सर्वोत्तम ,सर्वांहून सुंदर असा टेंभा मिरवणार्या त्या खुदपसंदीच्या गावात त्याच्यापेक्षा सर्वांग सुंदर अनेक चेहरे वावरत असतात पण त्यांना गल्लीभर भटक भवानी सारखे हुंदडून बोंबा मारण्याची गरज पडत नाही,कारण ती व्यक्तीमत्व आपल्या कर्तव्याशी,ध्येयांशी ,जबाबदारीशी कधी प्रतारणा करीत नाहीत.समाजाची बुज ते राखतात,त्यांच्यावर झालेल्या सकारात्मक संस्कारांचे परिणाम म्हणा किंवा विचारांचे अधिष्ठान म्हणा आपल्या सौंदर्याचा बाजार मांडतांना दिसत नाहीत.


माध्यमांच्या बाजारातही आज असे चिञ दुर्दैवाने दिसत असून वाचकांच्या दर्शकांच्या पसंतीक्रमात कोण बाजी मारते याविषयी स्व निर्मित परिक्षा व्यवस्था कार्यरत करण्यात आली आहे.खरे तर प्रसार माध्यमं ही स्वतः परिक्षक आहेत,असावेत.त्यांची परिक्षा घेण्याचा आणि निकाल प्रसारीत करण्याचा अधिकार फक्त आणि फक्त ग्राहक वाचकाला आहे.त्याचा निकाल प्रसिध्द कधी होत नाही,प्रत्यक्ष अप्रत्यक्ष वेगवेगळ्या मार्गाने त्याचा परतावा मिळत असतो.

विद्यमान परिस्थितीत प्रसार माध्यमांचा अहंकार इतका पराकोटीला गेला आहे की दर महिन्याला ही माध्यमं आपल्या लोकप्रियतेचे स्वगत गाण्यात जनहितासाठी वापरली जाऊ शकणारी प्रचंड उर्जा खर्ची घालतात.विशेषतः मुद्रीत माध्यमांनी तर याबाबतीत सर्व सीमा ओलांडल्या आहेत.जिथे देश राज्य पातळीवर महत्वाच्या घडामोंचा अधिकार आहे,सामान्य माणसाला भेडसावणार्या नानाविध अडचणींच्या वृत्तांचा अधिकार आहे त्या जागा मुद्रीत माध्यमांनी आधीच लाखो करोडोंना विकल्या आहेत.

त्यातच महिन्यातून दोनचार वेळा वृत्तपञाची चार चार पाने जाहीरात छापून तेच एक नंबर अशा जाहीराती करू लागले आहेत.एक नंबर कुणाचा हे वाचक ठरवतील.आपण आपली पाठ आपल्या हाताने थोपटण्याचा प्रयत्न केला तर हात निखळण्याचा धोका असतो हे शरीरशास्ञातील साधे तत्व ज्यांना अवगत नाही किंबहूना मिथ्या प्रसिध्दीच्या धुंदीत भान हरपल्याने माध्यमांचे शिवधनूष्य त्यांचे खांदे कसे पेलणार असा प्रश्‍न जाणकार वाचक उपस्थित करीत आहेत.

नंबर एक कोण आणि कोण लोकांना फसवतय,खरे तर ह्या वैयक्तिक भांडणात वाचकांचा काही दोष नाही.तुमची भांडणं ही नक्कीच तुमच्या वृत्तपञाची ’हेडलाईन’ होऊ शकत नाही! आणि तुम्ही खरोखर क्रमांक एकवर असाल तर ते तुम्ही स्वतःहून बोंबलून सांगण्याची गरज आहे का? हिरा अःधारातही चमकणारच ना...


ज्या गावात ही मंडळी एक नंबर आहेत त्या गावात आणखी बरीच वृत्तपञं आहेत.त्यांची एकूण वाचकसंख्या पाहीली तर त्यांच्या तुलनेत ही वृत्तपञे नक्कीच सरस ठरतात.तौलनिक दृष्ट्या भांडवल,मनुष्यबळ,अनुषंगीक यंञणा या पातळीवर ही नंबरी लढाईचा गवगवा नकरणारी वृत्तपञे सरस आहेत.सर्वात महत्वाचे म्हणजे या छोट्या वृत्तपञांनी त्यांची वाचकांशी असलेली बांधिलकी कधी सोडली नाही.पञकारीतेचा मुळ गाभा ध्येय बाजारातील ओट्यावर बसवून त्याचा धंदा केला नाही म्हणूनच कुठल्याही नंबरचा दावा न करता वाचकांच्या प्रेमावर या मंडळींच्या साठमारीतही ताठ कण्याने उभे आहेत.दाव्याची कोटी करणार्या या बाजारू माध्यमांची आपल्या ध्येयाशी किती निष्ठा आहे हे वाचकांना वेगळे सांगण्याची गरज नाही.

त्यांची धोरणे गेली खड्यात,वाचकांशी तरी ही मंडळी प्रामाणिक आहेत का? एखादा सन्माननीय अपवाद सोडला तर बाकी नंबरची फेकमत बातमी छापून वाचकांच्या पसंतीला उतरता येत नाही.याचा प्रत्यय या दावेदारांना सोशल मिडीयावर नेटीझन्स व्यक्त करीत असलेल्या प्रतिक्रियांमधून येत आहेच.थोडक्यात नकटीने नाकात नथ घालून गावाला वश करण्याचा प्रयत्न केला तरी विकृत जाळ्यात अडकतील.सौंदर्य पारखी नथीला कधीच भुलत नाही एव्हढे भान नंबरीनी ठेवायलाच हवे ना!