Breaking News

तालुक्यातील विकास कामांना कायम प्राधान्य : आ. थोरात


शहरालगत असलेल्या लोकसंख्येच्या दृष्टीने मोठया असलेल्या गुंजाळवाडीमध्ये विविध विकासकामे करण्यात आली आहेत. यापुढेही वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टीने वाढीव पाण्याचा प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहू. गुंजाळवाडीसह तालुक्यातील विविध विकास कामांना कायम प्राधान्य देण्यात आले आहे, असे प्रतिपादन माजी महसूलमंत्री, आ. बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
गुंजाळवाडी येथील वेताळनाथ यात्रौत्सव व रामनवमीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पंचायत समितीचे उपसभापती नवनाथ अरगडे, कारखान्याचे संचालक अभिजित ढोले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक महेंद्र गुंजाळ, सरपंच वंदना गुंजाळ, उपसरपंच नरेंद्र गुंजाळ, दूध सोसायटीचे चेअरमन पंढरीनाथ गुंजाळ, अण्णासाहेब गुंजाळ आदी उपस्थित होते. त्याचप्रमाणे रहाणेमळा, गुंजाळमळा, अरगडेमळा, कुर्‍हे, जगताप मळा व लक्ष्मीनगर पंचक्रोशीच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यास आ. बाळासाहेब थोरात यांनी भेट देत गावकर्‍यांशी थेट संवाद साधला.

यावेळी आ. थोरात म्हणाले, महाराष्ट्रात लोप पावत चाललेली आखाडी ही लोककला गुंजाळवाडी या गावाने मोठया श्रध्देने जोपासली आहे. ही कौतुकाची बाब आहे. गुंजाळवाडीला तालुका पंचायत समितीचे उपसभापती नवनाथ अरगडे यांच्या माध्यमातून पद देऊन या गावातील लोकांचा सन्मानच केला आहे. लोकसंख्येने मोठया असलेल्या गावातील पिण्याच्या पाण्याचे वाढीव पाण्यासाठी पाठपुरावा सुरु आहे. गावातील रस्ते मजबुतीकरण करण्याचे काम प्रस्तावित आहे. गावातील मंदिर व सार्वजनिक ठिकाणांचे सुशोभिकरण करण्यात आले आहे. यावेळी नवनाथ अरगडे म्हणाले, आ. थोरात यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात विकासाची घोडदौड सुरु आहे. म्हाळूंगी नदीवरील बंधार्‍याचे ओव्हरप्लोचे पाणी महादेव मंदिर पाझर तलावात नेण्याचे मनोदय आम्ही गावकर्‍यांनी केला आहे. इंद्रजित थोरात म्हणाले, की आ. थोरातांच्या मार्गदर्शनाखाली गावच्या एकूण परिस्थितीचा अभ्यास करून विविध विकास योजना प्रस्तावित करण्यात आल्या आहे. उपसभापती अरगडे यांच्या माध्यमातून व जि. प. सदस्य सिताराम राऊत यांच्या माध्यमातून विविध विकास कामे प्रस्तावित आहेत. याप्रसंगी स्थानिक ग्रामस्थ, महिला हजारोच्या संख्येने उपस्थित होते. विशेषतः युवकांची गर्दी उल्लेखनीय होती.